नवी मुंबई : गुन्हे शाखेने करावे गावात छापा टाकून चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. बेनापोल बोनगा सीमेवरून भारतात घुसखोरी करून जवळपास २० वर्षांपासून ते नवी मुंबई व इतर ठिकाणी वास्तव्य करत होते. त्यांच्याकडे आधार व पॅनकार्डही आढळून आले असून, मोबाइलवरून बांगलादेशमधील नातेवाइकांच्या संपर्कात असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
अटक केलेल्यांमध्ये रूकसाना नुरूल इस्लाम शेख (वय ३७), उंजिल खातून परवेल शेख (२७), पिंकी तारीख शेख (२७), रॉनी नुरूल इस्लाम शेख (३०) यांचा समावेश आहे. हे चारही जण करावेगाव सेक्टर ३६ मध्ये वास्तव्य करत होते. ते मूळचे बांगलादेशमधील जोशोर, नोडाईल, खुल्ना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या सर्वांकडे आधार कार्ड, पॅनकार्ड व मोबाइल फोन आढळून आले आहेत. त्यांच्या मोबाइलमध्ये ईमो नावाचे ॲप्लिकेशन आढळून आले. त्यामध्ये बांगलादेशमधील फोन नंबरवर कॉल व बांगलादेशी भाषेत चॅटिंग केल्याचेही आढळून आले आहे. व्हॉट्सॲपमध्येही बांगलादेशमधील नंबर आढळून आले असून, त्यांच्याबरोबर नियमित संपर्कात असल्याचे निदर्शनास आले आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली आहे. संशयितांना माहिती विचारली असता तिघांनी बेनापोल बोनगा सीमेवरून देशात घुसखोरी केल्याचे सांगितले. बांगलादेशमधील गरिबीला कंटाळून भारतामध्ये आल्याचे व येथून पुन्हा गावी नातेवाइकांना भेटण्यासाठी गेल्याचेही सांगितले. याविषयी पोलिस पुढील तपास करत आहेत.
कोणी कधी घुसखोरी केलीनुरूल शेख२००३-०४ मध्ये बेनापोल बोनगा सीमेवरून भारतामध्ये घुसखोरी. २०११ मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतामध्ये आली. आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र काढले आहे. मोबाइलवरून बांगलादेशमधील नातेवाइकांशी नियमित संपर्क.
उंजिला शेख२०१२ मध्ये पासपोर्ट काढून भारतामध्ये आली. पुन्हा गावी गेली नाही. आधार, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र आहे.
रॉनी शेख२००३-०४ मध्ये बेनापोल बोनगा सीमेवरून भारतामध्ये घुसखोरी. २०११ मध्ये बांगलादेशमध्ये जाऊन पुन्हा भारतामध्ये आली. आधारसह सर्व कागदपत्रे आहेत.
पिंकी शेख२००५-०६ मध्ये बेनापोल बोनगा सीमेवरून घुसखोरी. २०१० मध्ये पुन्हा बांगलादेशला जाऊन भारतामध्ये परत आली. मोबाइल, आधार, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्रही आहे.