ऑनलाईन फसवणुकीसाठी बँक खाते उघडणाऱ्यांना अटक; सायबर सेलची कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Published: April 2, 2024 05:45 PM2024-04-02T17:45:14+5:302024-04-02T17:45:40+5:30
आजी माजी बँक अधिकाऱ्यांचाच सहभाग उघड.
सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई : ऑनलाईन फसवणुकीचा बँक खाते उघडणाऱ्या दोघांना सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी वापरलेल्या बँक खाते गोठवून त्यामधील १५ लाखाची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. दोघेही उल्हासनगर येथील बँकेचे आजी माजी अधिकारी आहेत.
ट्रेडिंगच्या बहाण्याने नागरिकांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या टोळ्या देशभरात सक्रिय झाल्या आहेत. अशाच काही टोळ्यांनी नवी मुंबईतल्या नागरिकांना देखील लाखोंचा चुना लावला आहे. त्यामध्ये वापरण्यात आलेल्या बँक खात्यांची माहिती सायबर पोलिसांकडून मिळवली जात होती. यासाठी सायबर सेलचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कदम यांनी निरीक्षक विशाल पाडीत, उपनिरीक्षक रोहित बंडगर, हवालदार विजय आयरे, रविराज कांबळे आदींचे पथक केले होते. त्यांनी तांत्रिक तपासद्वारे उल्हासनगर येथील इंडसइंड बँकेतील एका कर्मचाऱ्याचे धागेदोरे उघड करून दोघांना अटक केली आहे. प्रवीणकुमार मिश्रा (२६) व अशोक चौहान (२७) अशी त्यांची नावे आहेत.
प्रवीणकुमार हा सध्या बँकेत अधिकारी असून अशोक देखील पूर्वी त्याच बँकेत कामाला होता. अशोक हा ऑनलाईन गुन्ह्यात वापरण्यासाठी बँक खाती उघडण्यासाठी बनावट ग्राहकांना घेऊन यायचा. तर प्रवीणकुमार हा त्याला खाते उघडून देण्यास मदत करायचा. त्यानंतर उघडलेल्या बँक खात्याचे पासबुक, एटीएम कार्ड ताब्यात घेऊन अशोक हा पुढील साथीदारांपर्यंत पोहचवायची. अशा प्रकारे त्यांनी उघडलेल्या खात्यांचा ऑनलाईन फसवणुकीसाठी वापर करून अनेकांची फसवणूक केल्याचे सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे यांनी सांगितले. हि बँक खाती गोठवण्यात आली असून त्यामध्ये १५ लाखांची रोकड मिळून आली आहे. त्याशिवाय दोघांकडून ४ मोबाईल, ८ सिमकार्ड, ७ डेबिट कार्ड, २ चेकबुक, ३ पासबुक, ६ रबर स्टॅम्प जप्त करण्यात आले आहेत. त्यांचा चार गुन्ह्यातील सहभाग समोर आला असून सायबर पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.