नवी मुंबई : भुयारी मार्गाद्वारे बँकेत घुसून लॉकरमधील ऐवज लुटणाºया टोळीच्या शोधाकरिता विशेष तपास पथके तयार करण्यात आली आहेत. तपासादरम्यान बँकेबाहेरील एका सीसीटीव्हीमध्ये तीन दरोडेखोर दिसून आले आहेत. मात्र कॅमेरापासून तोंड लपवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न करून पोबारा केला आहे.बँक आॅफ बडोदा लुटण्यासाठी गुन्हेगारांनी वापरलेल्या पध्दतीने संपूर्ण पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. पाच फूट जमिनीखाली ३० फूट लांब बोगदा खोदून ते बँकेच्या लॉकर रुममध्ये पोचले होते. तर लॉकर फोडून त्यामधील ऐवज लुटल्यानंतर सोमवारी बँक उघडण्यापूर्वीच एक दिवस अगोदर रविवारी सकाळीच त्यांनी पळ काढला आहे. यादरम्यानच्या त्यांच्या हालचाली बँकेच्या एका सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लुटीचा ऐवज घेवून ते त्याठिकाणावरून रेल्वेस्थानकाच्या दिशेने गेले आहेत. मात्र पाच महिन्यांच्या मुक्कामादरम्यान त्यांनी बँकेबाहेर कॅमेरा असल्याचे लक्षात ठेवून त्यामध्ये चेहरा दिसणार नाही, याची खबरदारी घेतल्याचेही हालचालीवरून दिसून येत आहे. त्यामुळे पूर्णपणे नियोजनबध्द पध्दतीने त्यांनी ही बँक लुटल्याचे दिसून येत आहे. तर घटना उघडकीस येण्याच्या एक दिवस अगोदरच त्यांनी पळ काढलेला असल्यामुळे ते राज्याबाहेर देखील निघून गेले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांपुढेही त्यांना शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
बँक आॅफ बडोदा दरोडा प्रकरण : सीसीटीव्हीत दिसले तीन दरोडेखोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 2:37 AM