बँक दरोडा प्रकरण : रात्रीच्या वेळी गोणीतून काढायचे माती, भुयार खोदताना डेब्रिज टाकले नाल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 02:43 AM2017-11-16T02:43:26+5:302017-11-16T02:44:03+5:30
जुईनगर येथील बडोदा बँक लुटण्यासाठी खोदण्यात आलेल्या भुयाराचे डेब्रिज पोलिसांना आढळून आले आहे. रात्रीच्या वेळी बँकेपासून सुमारे दीडशे मीटर अंतरावरील नाल्यालगत ते टाकण्यात आले होते.
नवी मुंबई : जुईनगर येथील बडोदा बँक लुटण्यासाठी खोदण्यात आलेल्या भुयाराचे डेब्रिज पोलिसांना आढळून आले आहे. रात्रीच्या वेळी बँकेपासून सुमारे दीडशे मीटर अंतरावरील नाल्यालगत ते टाकण्यात आले होते. या वेळी जर बँकेला सुरक्षारक्षक असता तर गुन्हेगारांचा हा मनसुबा वेळीच फसला असता.
जुईनगर येथील बडोदा बँक लुटण्यासाठी भुयार खोदण्यात आले होते. सोमवारी हा प्रकार उघड झाल्यानंतर सुमारे तीस फूट लांब भुयार पाहून सर्वांना धक्काच बसला होता. या वेळी दरोडेखोरांनी भुयार खोदताना निघालेले डेब्रिज टाकले कुठे, असाही प्रश्न पोलिसांना पडला होता.
अखेर भुयाराचे ते डेब्रिज घटनास्थळापासून सुमारे दीडशे मीटर अंतरावर नाल्यालगत टाकल्याचे आढळून आले आहे. रात्रीच्या वेळी गोणीत भरून त्या ठिकाणी ते टाकले जायचे. या वेळी त्यांना आजूबाजूच्या कोणीच हटकले नाही. याबाबतदेखील शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र जर बँकेला सुरक्षारक्षक असता तर हा प्रकार निदर्शनास आला असता आणि बँकेची लूट टळली असती.
भुयार खोदण्यासाठी वापरलेला गाळा व बँक यांमध्ये केवळ तीन गाळ्यांचे अंतर आहे. यामुळे जर बँकेला रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक असता, तर त्यांच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या असत्या.
परंतु बँक आॅफ बडोदाला रात्री अथवा दिवसासाठी सुरक्षारक्षक नेमलेला नव्हता. केवळ एटीएम सेंटरच्या ठिकाणी फक्त दिवसापुरती एक वृद्ध व्यक्ती सुरक्षारक्षक म्हणून नेमलेली होती. रात्री कोणीही सुरक्षारक्षक नव्हता. त्यामुळे बँकेकडून सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत आहे, तर गुन्हेगारांनीदेखील कसलाही पुरावा मागे राहणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली गेली असल्याचे दिसून येत आहे.
यानुसार लॉकर फोडून ऐवज लुटून पळ काढण्यापूर्वी वापरलेला गाळा त्यांनी ओल्या फडक्याने पुसून काढल्याचे समजते. तर लॉकर तोडताना आवाज होऊ नये याकरिता स्क्रू ड्रायव्हरने ते उघडण्यात आल्याचेही सूत्रांकडून समजते. अन्यथा प्रत्येक लॉकरचे दोन्ही टाळे तोडण्यासाठी त्यांना अधिक वेळ लागला असता व ते जास्त लॉकर फोडू शकले नसते. एकंदर या घटनेचा तपास करणे हे पोलिसांपुढे आव्हान बनले आहे.
गेनाविरोधात पुरावा नाही-
बँकेलगतचा गाळा मिळवण्यासाठी गेना प्रसाद नावाने भाडेकरार करण्यात आला होता. मात्र ही व्यक्ती गाळा ताब्यात घेतल्यानंतर तो सहकाºयांच्या ताब्यात देऊन पसार झालेली आहे. भाडे करारावरील त्याच्या छायाचित्राशिवाय कसलाही ठोस पुरावा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.