बँकेचे कर्मचारी हवालदिल
By admin | Published: November 12, 2016 06:44 AM2016-11-12T06:44:22+5:302016-11-12T06:44:22+5:30
पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवरील निर्बंधामुळे एकीकडे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, नोटा बंदीमुळे बँकांचे काम वाढले आहे
नवी मुंबई : पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवरील निर्बंधामुळे एकीकडे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, नोटा बंदीमुळे बँकांचे काम वाढले आहे. गुरुवारपासून बँक कर्मचारी कसोटी पणाला लावून काम करतानाचे चित्र दिसून येत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळेही बँकाना नोटा बदलण्याकरिता कसरत करावी लागणार असल्याने जेवणाची वेळही कमी करण्यात आली आहे.
शनिवारी आणि रविवारीदेखील कर्मचाऱ्यांना आॅन ड्युटी राहावे लागणार असल्याने बँक कर्मचाऱ्यांचे गणित जुळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. दिवसभर ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा, प्रश्नांचा भडीमार यामुळे बँक कर्मचाऱ्यांना मोकळा श्वास घेणेही कठीण झाले आहे.
सोशल मीडियावर फिरणारे मेसेजेस काही वेळेस नागरिकांची दिशाभूल करणारे ठरत असल्याने ग्राहकांच्या शंकांचे निरसन करून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे आवाहन बँक कर्मचाऱ्यांना पेलावे लागत असल्याची माहिती अभ्युदय बँकेचे कर्मचारी दक्षता ठाकरे यांनी दिली. बँकेच्या बाहेरील भिंतीवरही ग्राहकांच्या शंका दूर करणारे फलक लावण्यात आले आहेत. सलग तिसऱ्या दिवशीही ग्राहकांना सुट्या पैशांसाठी तासन तास रांगेत उभे राहावे लागले. (प्रतिनिधी)
पनवेल : सरकारचे आदेश धाब्यावर बसवून काही बँकांकडून केवळ खातेदारालाच नोटा बदलून दिल्या जात असल्याने शुक्रवारी दिसून आले. त्यामुळे जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकेत आलेल्या अनेकांची निराशा झाली. आपले पैसे वाया जातील की काय, असा संभ्रम सामान्यांमध्ये निर्माण झाल्याने बँक उघडण्याआधीच लांबचलांब रांगा शुक्र वारी दुसऱ्या दिवशीही सकाळपासून बँकासमोर लागल्या होत्या. नोटा बदलण्यासाठी बाहेरगावचे प्रवसी व कामाच्या शोधात असलेल्यांची संख्याही मोठी आहे. मात्र, बँकामध्ये खाते नसल्याने त्यांना नोटा बदलून देण्यास काही बँकांकडून आडकाठी करण्यात येत आहे.
1अनेकांना पैसे असूनही सुट्या पैशांअभावी दैनंदिन दूध, भाजी, औषधे खरेदी करता येत नाहीत. नोटा बदलण्यासाठी बाहेरगावचे प्रवासी व कामाच्या शोधात असलेल्यांची संख्याही मोठी आहे. सरकारचा आदेश धाब्यावर बसवून केवळ खातेदारांनाच जुन्या नोटा बदलून दिल्या जात आहेत. इतरांना मात्र आमच्याकडे रोख रक्कम नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे घरकाम करून किंवा मोलमजुरी करणारे मेटाकुटीस आले आहेत.
2खातेदार नसलेल्याचा फॉर्म भरून घेतल्यावर तो पुन्हा अपलोड करावा लागतो, यात वेळ जातो. त्यातच आमच्याकडे नवीन नोटा अद्याप पुरेशा आलेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही खातेदारालाच नोटा बदलून देतो अशी माहिती एक बँक अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी सोय नाही. सरकारने 30 डिसेंबरपर्यंत नोटा बदलण्याचा निर्णय बदलला तर माझ्याकडच्या पैशांचे काय करू, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांना पडला आहे.