बाप्पा पावणार, सार्वजनिक गणेश मंडळांना अनामत रकमेसह भाडे होणार माफ
By नारायण जाधव | Published: August 25, 2023 03:21 PM2023-08-25T15:21:07+5:302023-08-25T15:21:17+5:30
या मागणीचा सकारात्मक विचार करून सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडप भाडे माफ करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनामत रकमेसह मंडप भाडे माफ करावे, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या यांच्याकडे आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडप भाडे माफ करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका क्षेत्रात विविध सार्वजनिक मंडळे कार्यरत असून, या मंडळांच्या माध्यमातून गणेशोत्सवाबरोबरच अनेक लोकोपयोगी असे उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यामुळे त्या-त्या विभागातील गोरगरीब व गरजू नागरिकांना त्याचा फायदा होतो.
महापालिकेच्या विविध उपक्रमांत ते सक्रिय सहभागी होतात; परंतु मागील दोन वर्षांत विविध कारणांमुळे या मंडळांची आर्थिक स्थिती नाजूक झाली असल्याने त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळावा, यासाठी अनामत रक्कम आणि मंडप भाडे माफ करण्याची मागणी आमदार म्हात्रे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाचा हवाला त्यांनी आपला पत्रात दिला आहे.
यासंदर्भात आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सकारात्मक दिला असून लवकरच ठाणे महापालिकेच्या धर्तीवर नवी मुंबईतही अनामत रक्कम आणि मंडप भाडे माफीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्या म्हणाल्या.