नवी मुंबई : जुईनगर येथील बडोदा बँक लुटीच्या गुन्ह्यावर मोका लावण्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात अटक असलेल्या ११ जणांना पुन्हा पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील दोन किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.सुमारे ३० फूट लांब भुयार खोदून जुईनगर येथील बडोदा बँक लुटल्याचा गुन्हा नोव्हेंबर महिन्यात घडला होता. बँकेतील ३० लॉकर फोडून चोरट्यांनी त्यामधील ग्राहकांनी ठेवलेला ऐवज चोरला होता. त्यानुसार या गुन्ह्यामध्ये सुमारे चार कोटी रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेलेला, अशा प्रकारचा देशातील दुसरा व राज्यातला पहिलाच गुन्हा असल्याने तपासात नवी मुंबई पोलिसांची कसोटी पणाला लागली होती. अखेर गुन्ह्याचा उलगडा करून पोलिसांनी ११ जणांच्या टोळीला काही दिवसांतच अटक केली. शिवाय त्यांच्याकडून गुन्ह्यातले साडेपाच किलो सोन्याचे दागिने जप्त केले होते. अनेक महिने रेकी करून या टोळीने बँकेलगतचा गाळा भाड्याने घेऊन भुयार खोदले होते. तर गुन्हा करताना अथवा केल्यानंतर पकडले जाऊ नये, याचीही पुरेपूर खबरदारी त्यांनी घेतलेली. यामुळे संघटित होऊन गुन्हा केल्या प्रकरणी या टोळीवर मोका लावण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या होत्या. त्यानुसार बडोदा बँक लुटीच्या गुन्ह्यावर मोका लावण्यात आला आहे. त्यामध्ये टोळीचा म्होरक्या हाजीद अली सबदर अली मिर्जा बेग उर्फ अज्जू उर्फ लंगडा याच्यासह श्रावण हेगडे उर्फ संतोष कदम उर्फ काल्या, मोमीन खान उर्फ पिंटू, अंजन महांती उर्फ रंजन, मोइद्दीन शेख उर्फ मेसू, राजेंद्र वाघ, शहनाजनी शेख, कमलेश वर्मा, शुभम निशाद, जुम्मन अली अब्दुल शेख मेहरुन्निसा मिर्झा यांच्यासह त्यांच्या फरार साथीदारांचा समावेश आहे.मोका लागल्याने न्यायालयीन कोठडीत असलेल्या अकराही आरोपींना पुन्हा १२ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. या दरम्यान त्यांच्या अधिक चौकशीत त्यांच्याकडून सुमारे दोन किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्यापैकी सानपाडा पोलिसांनी जोगेश्वरी येथून एक किलो १४५ ग्रॅम, तर गुन्हे शाखेने ६०० ग्रॅम दागिने जप्त केले आहेत. यामुळे सदर गुन्ह्यात अद्यापपर्यंत सुमारे साडेसात किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. टोळीचा म्होरक्या हाजीद बेग हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर १५०हुून अधिक तर त्याच्या टोळीवर राज्यासह राज्याबाहेर अनेक गुन्हे दाखल आहेत. बडोदा बँकेतून लुटलेल्या सोन्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो सोनाराचे दुकान सुरू करणार होता. तत्पूर्वीच पोलिसांनी शिताफीने गुन्हा उघड करून बेगसह त्याच्या सहकाºयांना अटक केली. मात्र, भुयार खोदण्यासाठी वापरलेले चार कामगार फरार असून, त्यांच्याकडील गुन्ह्यातला चोरीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागलेला नाही.बेग याने टोळीच्या मदतीने राज्यात अनेक ठिकाणी टेहळणी केल्यानंतर जुईनगरमध्ये बडोदा बँकेलगतचा गाळा भाड्याने मिळवला होता. त्यानुसार सुमारे पाच महिने ते त्या ठिकाणी भुयार खोदण्याचे काम करत होते. अखेर सलग तीन दिवस बँक बंद असल्याची संधी साधून त्यांनी बँकेत प्रवेश करून ७० लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी ३० लॉकर फोडण्यात यश आल्याने त्यामधील सुमारे चार कोटींचा ऐवज घेऊन त्यांनी पळ काढला होता; परंतु भुयारामध्ये त्यांनी मागे सोडलेले एक वृत्तपत्र व गुटख्याचे पाकीट यावरून, तसेच सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला.
बडोदा बँक दरोडा प्रकरण : बँक लुटणा-या टोळीवर मोका , ११ जणांना पुन्हा पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:29 AM