बडोदा बँक लूट प्रकरण : बँकेचा खातेधारक बनून केली रेकी, मुख्य आरोपीच्या शोधात पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:31 PM2017-11-18T23:31:57+5:302017-11-18T23:32:17+5:30
बडोदा बँक लुटणा-या टोळीच्या संशयित चौघांना ताब्यात घेतल्यानंतर गेणा प्रसाद याचा पोलीस शोध घेत आहेत. गेणा हा सूत्रधार असून त्यानेच दुकानासाठी गाळा भाड्याने घेतला होता; परंतुत्याच्याविषयीची अधिक माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
नवी मुंबई : बडोदा बँक लुटणा-या टोळीच्या संशयित चौघांना ताब्यात घेतल्यानंतर गेणा प्रसाद याचा पोलीस शोध घेत आहेत. गेणा हा सूत्रधार असून त्यानेच दुकानासाठी गाळा भाड्याने घेतला होता; परंतुत्याच्याविषयीची अधिक माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
बँकेच्या सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे काढणारा प्रकार जुईनगर येथील बडोदा बँकेच्या लूट प्रकरणात घडलेला आहे. ३० फुटांहून लांब भुयार खोदून बँकेचे लॉकर तोडून सुमारे तीन कोटी रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान तिघांनी हा गुन्हा केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत होता. तसेच गुन्ह्याच्या पद्धतीवरून झारखंडच्या टोळीचा त्यात समावेश असल्याचीही शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात मात्र पाच ते सात जणांनी एकत्रित येऊन हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
बँकेत सुरक्षेच्या बाबतीत अनेक त्रूटी होत्या, असा ग्राहकांचाही आरोप आहे. अनेकदा लॉकर रूम उघडीच असताना कोणीही त्या ठिकाणी सहज जायचे. याच संधीचा फायदा घेत त्यांनी लॉकर रूमपर्यंतचे अंतर मोजून भुयार खोदून सुट्टीच्या दिवशी बँक लुटली. या संपूर्ण कटामागे गाळा भाड्याने घेणारा गेणा प्रसाद नावाने गाळा भाड्याने घेणारी व्यक्ती असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या टोळीने झारखंडची टोळी ज्या पद्धतीने बँका व ज्वेलर्सना लुटतात, त्याच पद्धतीने बडोदा बँक लुटलेली आहे.
सीसीटीव्हीमुळे महत्त्वाची माहिती हाती
पोलिसांनी बँकेच्या आवारातील, रेल्वेस्थानक व परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. त्याआधारे मुंबईतून चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी गेणा प्रसाद नावाने गाळा भाड्याने घेणाºया व्यक्तीला व त्याच्या सहकाºयांना मदत केल्याचे समजते.
कामगार असल्याचे भासवून त्याने दुकानात ठेवलेल्या तिघांनी पाच महिन्यांत दुकानापासून ते बँकेच्या लॉकर रूमपर्यंत भुयार खोदले होते. याकरिता टोळीपैकी ऐकाने बडोदा बँकेत जनधन योजने अंतर्गत खाते उघडून रेकी केल्याचेही समजते.