कळंबोली - कळंबोली येथील कॅप्टनबारमध्ये शनिवारी रात्री परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या पथकाने कारवाई केली. या वेळी महिला वेटर, बार व्यवस्थापक आणि ग्राहक असे मिळून ५४ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले.मॅक्डोनाल्ड हॉटेलच्या बाजूला कॅप्टन लेडीजबार आहे. या ठिकाणी दोन वेळा पोलिसांनी धाडी टाकल्या. आधी गुन्हे शाखा आणि त्यानंतर परिमंडळ-१ मधील पथकाने कारवाई केली होती, यामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक एम. आर. खाडे यांना निलंबित व्हावे लागले. त्यानंतर शनिवारी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या पथकाने बारवर कारवाई केली. यामध्ये ३० महिला वेटर आणि २३ ग्राहक व हॉटेल व्यवस्थापकाला अटक करण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाने अटी रद्द केल्यानंतर पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे. याअगोदर ज्या ज्या वेळी कारवाई झाली, त्या वेळी ग्राहक सोडून महिला वेटर तसेच व्यवस्थापकाला ताब्यात घेतले जात असे; परंतु शनिवारच्या कारवाईत ग्राहकांनाही ताब्यात घेण्यात आले.कॅप्टन बारवर कारवाई : पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात लेडीजबार आहेत. विशेष करून, मुंबई- पुणे महामार्गालगत कोन परिसरात जास्त लेडीजबार आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांनी कॅप्टन बार रडारवर घेतल्याचे दिसून येत आहे. एका पाठोपाठ बाहेरचे पोलीस येऊन धाडी टाकीत असल्याची नोंद आहे. अशाच प्रकारची कारवाई नियम धाब्यावर बसविणाऱ्या कोन तसेच इतर ठिकाणच्या बारवर का होत नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
पनवेलमधील बारवर कारवाई, ५४ जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 5:00 AM