गावाच्या प्रवेशद्वाराचा पाया गटारात; करावेतला प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 11:25 PM2020-03-08T23:25:52+5:302020-03-08T23:26:00+5:30
ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे सांडपाणी वाहतुकीला अडथळा
नवी मुंबई : पालिकेतर्फे शहरातील सर्व मूळ गावांच्या प्रवेशावर कमानी उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यादरम्यान ठेकेदारांकडून हलगर्जीपणा होत असल्याचे करावे येथील कामादरम्यान दिसून येत आहे. मोठ्या गटाराच्या मध्यभागीच कमानीचा पाया उभारण्यात आल्याने त्या ठिकाणी पाणी तुंबून रस्ता जलमय होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नवी मुंबईच्या शहरीकरणात मूळ गावठाणांची ओळख टिकावी यासाठी केलेल्या लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून प्रशासनाने प्रत्येक गावाच्या प्रवेशद्वारावर कमानी उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार अनेक गावांच्या प्रवेशद्वारावर कमानी उभ्या राहिल्या असून काही ठिकाणी काम सुरू आहे. परंतु या कमानी उभारल्या जात असताना आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे ठेकेदाराकडूनही भविष्यात अडचणी निर्माण होतील अशा ठिकाणी कमानी उभारल्या जात आहेत. असाच प्रकार करावे गावाच्या बांधकाम सुरू असलेल्या कमानीच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. करावे गाव व पामबीच मार्गाला जोडणाऱ्या दोन रस्त्यांच्या मध्यभागी मोठे गटार आहे. या गटारातून परिसरातील सांडपाणी वाहून पामबीचलगतच्या तलावात त्याची विल्हेवाट लावली जाते. अनेकदा पावसाळ्यात हे गटार तुंबल्यास अथवा त्यामधील पाण्याचा प्रवाह वाढल्यास त्यातले पाणी रस्त्यावर येऊ लागते. मैदानदेखील जलमय होत असते. यानंतरही हे गटार फोडून त्याच्या मध्यभागी प्रवेशद्वाराचा पाया उभारला जात आहे. गटारामध्ये कमानीचा पाया उभारला जात असल्याचे पाहून अनेकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. तर काहींनी ठेकेदाराला त्यासंबंधीचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वसामान्यांकडून मांडल्या जाणाºया सूचनांकडे दुर्लक्ष करत या कमानीचे काम सुरू आहे. त्यामुळे सदर गटारातील पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार आहे. परिणामी पावसाळ्यात तिथले दोन्ही मार्ग जलमय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या ठिकाणी गटारामध्येच ही कमान उभारली जात आहे. त्यापासून काही अंतरावरच पुरेशी जागा असतानाही तिथे कमान उभारणीकडे दुर्लक्ष होत असल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकारावरून कमानी उभारताना खबरदारीच्या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचेही दिसून येत आहे.