नवी मुंबई : शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भूपेंद्र शहा यांच्यावर न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट शासकीय कागदपत्रे बनविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिगल हेबीटेट प्रा. लि. या कंपनीने दाखल केलेल्या तक्रारीवरून भूपेंद्र शहा यांच्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.भूमीराज ग्रुपचे संचालक भूपेंद्र शहा यांनी गव्हाण येथील सर महम्मद युसुफ ट्रस्टचा अध्यक्ष हारुन अलिम याच्याशी संगनमत करून १९९५ मध्ये ट्रस्टची ८0 एकर जागा केवळ ४ लाखांत विकत घेतली. बनावट शेतकरी दाखल्याच्या आधारे भूपेंद्र व त्यांच्या साथीदारांनी संगनमताने शेकडो कोटींची जमीन हडप करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती तक्रारदार विक्रम भणगे व कंपनीचे सल्लागार निवृत्त पोलीस महानिरीक्षक विजय चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.विविदीत ८0 एकर जमिनीपैकी सर्व्हे क्रमांक ३५६/७ (अ) चे नमूद केलेले विभाजित क्षेत्रफळ पनवेल तहसीलदारांनी हरिभाऊ पाटील या कुळाने दाखल केलेल्या अपिलावर निर्णय देताना २00६ मध्ये केले होते. असे असतानाही १९९५ च्या खरेदीखतात सर्व्हे क्रमांक ३५६/७ (अ) चे विभाजित क्षेत्रफळ नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हे खरेदीखतच बोगस असल्याची तक्रार विक्रम भणगे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे खरेदीखतात वापरण्यात आलेले स्टॅम्प पेपर रखमाबाई घरत यांच्या नावे आहे. मुळात या व्यवहाराशी सदर महिलेचा कोणताही संबंध नाही. विशेष म्हणजे सर महम्मद युसुफ ट्रस्टचे अध्यक्ष हारून अलिम यांनी इतर ट्रस्टींना अंधारात ठेवून हे खरेदीखत तयार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण व्यवहारासाठी लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील खुटेगाव येथून अवघ्या एका दिवसात शेतकरी असल्याचा बोगस दाखला मिळवून त्याद्वारे हे खरेदीखत तयार केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या तक्रारीच्या आधारे न्हावा-शेवा पोलिसांनी भूपेंद्र शहा यांच्यासह महम्मद युसुफ ट्रस्टचा अध्यक्ष हारु न अलीम ए.आर.युसुफ, सुरेश शेडगे, बाज खान, रमेश भालेराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पनवेल, लातूर आदी ठिकाणांहून सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर चौकशीअंती या गुन्ह्यातील आरोपींवर पुढील कारवाई केली जाईल, असे परिमंडळ-२चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात आपणाला अद्याप काहीही माहिती नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे भूपेंद्र शहा यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले आहे.> सिडकोच्या २२.५ टक्के जमिनीवर डोळामहम्मद युसुफ ट्रस्टची ८0 एकर जमीन संपूर्ण दलदलीची व खारफुटीयुक्त असल्यामुळेच आपण ही जमीन चार लाख रु पयांत विकत असल्याचे ट्रस्टच्या ठरावात अध्यक्ष हारु न अलिम याने म्हटले आहे. त्यामुळे ही खारफुटीयुक्त जमीन आता सिडकोच्या घशात घालून सिडकोकडून साडेबावीस टक्के योजनेअंतर्गत सुमारे ५0 हजार चौ.मी. भूखंड प्राप्त करण्याचा डाव संबंधित बिल्डरने आखल्याचा आरोप तक्रादाराने केला आहे.
बनावट दाखल्याच्या आधारे कोट्यवधींची जमीन लाटली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 5:48 AM