अपंगांना मिळाला कृत्रिम पायाचा आधार
By admin | Published: May 1, 2017 06:49 AM2017-05-01T06:49:04+5:302017-05-01T06:49:04+5:30
ऐरोली येथे आयोजित शिबिरात २५० अपंगांना कृत्रिम पायाचा आधार मिळाला आहे. राज्यासह राज्याबाहेरील गरीब अपंगांनी
नवी मुंबई : ऐरोली येथे आयोजित शिबिरात २५० अपंगांना कृत्रिम पायाचा आधार मिळाला आहे. राज्यासह राज्याबाहेरील गरीब अपंगांनी या शिबिराचा मोफत लाभ घेतला. अपघातामध्ये पाय गमावलेल्यांकरिता विविध संघटनांनी एकत्रित येऊन या शिबिराचे आयोजन केले होते.
अपघातामध्ये हात, पाय गमावलेल्या अनेकांना आर्थिक परिस्थितीअभावी त्यावर उपचार करता येत नाहीत. यामुळे अपघातानंतरचे पुढचे आयुष्य त्यांना कुटुंबातील व्यक्तींवरच आधारित जगावे लागते. पर्यायी अनेकजण अंथरुणाला खिळून असतात. अशाच गरीब कुटुंबातील अपंगांना मदतीच्या उद्देशाने ऐरोली येथे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीर विकलांग साहाय्यता समिती, फ्रिडम फॉर यू फाउंडेशन व डाऊ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर भरवण्यात आले होते. त्याकरिता डॉ. रवी कुमार, आशा अलबोट, नारायण व्यास, किरण न्यायनित, राजश्री बालसुब्रह्मण्यम, प्रकाश देशमुख, शर्मीला गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला महापालिकेतर्फेही सहकार्य लाभले.
सलग दोन वर्षे त्यांच्याकडून हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. त्यानुसार यंदाही २६ ते २८ एप्रिल दरम्यान हे शिबिर संपन्न झाले. या वेळी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत ज्यांनी अपघातामध्ये आपले पाय गमावले आहेत, त्यांना कृत्रिम पायवाटप करण्यात आले. तज्ज्ञांच्या मार्फत तपासणी करून त्यांना या कृत्रिम पायाची जोड देण्यात आली.
विशेष बाब म्हणजे ज्यांना जे कृत्रिम पाय अनेकांना उभे राहण्याचे बळ देत होते, ते पाय बनवणारे हातही अपंग होते. त्यानुसार या तीन दिवसीय शिबिरादरम्यान २५० जणांना कृत्रिम पाय जोडल्याचे किरण न्यायनित यांनी सांगितले. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी राज्याच्या विविध ठिकाणांसह गोवा, गुजरात या ठिकाणच्या गरजूंनीही उपस्थिती दर्शवली होती. (प्रतिनिधी)