योगेश पिंगळेनवी मुंबई : शोभिवंत माशांच्या वाढलेल्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी अनेक वेळा विध्यांसक पद्धतीचा वापर करून अनियंत्रितपणे प्रवाळ बेटांमधून हे मासे पकडले जातात. त्यामुळे तेथील जैवविविधतेवर परिणाम होतो. हा विपरित परिणाम रोखण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन कक्षाच्या माध्यमातून एरोली येथील किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्रात शोभिवंत माशांचे प्रजनन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रामधून क्लाउनफिशची पिल्ले किनाऱ्यावरील बचतगटांना उपलब्ध करून दिली जाणार असून, त्याला बाजारपेठदेखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे स्थानिकांना आणि बचतगटांना उपजीविकेचे साधन प्राप्त होणार असून, आधार मिळणार आहे.
कांदळवन आणि सागरी जैवविविधतेला गेल्या काही वर्षांपासून धोका निर्माण झाला आहे. त्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे काळाची गरज असून या माध्यमातून तेथील स्थानिकांसाठी उपजीविकेचे साधन निर्माण व्हावे, या अनुषंगाने कांदळवन कक्षाने खेकडा पालन, जिताडा पालन, शिंपले पालन, शोभिवंत मत्स्य पालन आदी विविध उपक्र म सुरू केले आहेत. अशा उपक्र मांमुळे कांदळवन व सागरी अधिवासातून स्थानिकांसाठी उपजीविकेची साधने निर्माण होतात व या अधिवासाचे संरक्षण होण्यास स्थानिकांचा हातभार लागतो. ऐरोली येथे क्लाउनफिश प्रजनन केंद्र उभारण्यात आले आहे.
यामध्ये विविध दहा प्रजातींचा समावेश असून ऐरोली येथील प्रजनन केंद्रातून राज्यातील किनारपट्टीवर राहणाºया लाभार्थ्यांना क्लाउनफिशची पिल्ले देण्यात येणार आहेत. तसेच क्लाउनफिश संगोपन तंत्रज्ञान अवगत करून कार्यशाळाही घेतल्या जाणार आहेत.मत्स्य जातींची ओळख, पाण्याची गुणवत्ता राखणे, रोग निवारण आणि औषध, उपयुक्त उपकरणे, पॅकिंग, वाहतूक आदी महत्त्वाच्या घटकांविषयी पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
आज होणार उद्घाटनऐरोली येथील शोभिवंत माशांच्या पैदास केंद्राचे उद्घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार असून, या वेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाने कांदळवन प्रतिष्ठानला दिलेल्या ३६ सीटर बसचा लोकार्पण सोहळादेखील संपन्न होणार आहे. सदर बसची सेवा शासकीय व निमशासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रास भेट देण्यासाठी पुरविली जाणार आहे.