बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड वापरणारे रॅकेट उघडकीस
By admin | Published: April 13, 2017 02:56 AM2017-04-13T02:56:29+5:302017-04-13T02:56:29+5:30
टाटा डोकोमो कंपनीचे सिमकार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे कार्यान्वित करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ११२० सिमकार्ड व बनावट
नवी मुंबई : टाटा डोकोमो कंपनीचे सिमकार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे कार्यान्वित करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून ११२० सिमकार्ड व बनावट कागदपत्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
विजय हरिप्रसाद यादव व सतीश हरिश्चंद्र गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. टाटा डोकोमो मोबाइल कंपनीने सिमकार्ड विक्रीचे दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी खांदा कॉलनी पनवेल येथील व्ही. जे. मोबाइल शॉपमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड अॅक्टिव्हेट केलेल्या मोबाइल नंबरची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रमोद पाटील यांना मिळाली होती. ते मोबाइल क्रमांक अॅक्टिव्हेट करण्यासाठी वापरण्यात आलेल्या कागदपत्रांसह कॅप फॉर्म टाटा डोकोमो कंपनीकडून प्राप्त केले असता ते बनावट असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त दिलीप सावंत, सहायक पोलीस आयुक्त नितीन कौसाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्या पथकाने नवीन पनवेल सेक्टर ७ मधील दुकानावर छापा मारला. कंपनीमध्ये व्ही. जे. मोबाइल शॉपमध्ये टाटा डोकोमो कंपनीचे सुमारे ११२० सिमकार्ड, ते अॅक्टिव्हेट करण्यासाठी वापरण्यात येणारे ८ मोबाइल फोन, वेगवेगळ्या मोबाइल दुकानांच्या नावाचे १६ रबरी स्टँप व प्रीपे कस्टमर अॅप्लिकेशन फॉर्म १३ मिळून आले आहेत.
या प्रकरणी विजय यादवला अटक केली आहे. त्याच्याकडे चौकशी केली असताना कंपनीने प्रत्येक महिन्याला २१०० सिमकार्ड विक्रीचे दिलेले टार्गेट पूर्ण न केल्यास कमिशन मिळत नाही. नमूद टार्गेट पूर्ण केल्यास कंपनीकडून जास्त प्रमाणात कमिशन मिळून त्यास आर्थिक फायदा होतो. कंपनीकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळविण्याकरिता बनावट आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र व रबरी शिक्क्यांचा वापर करून सिमकार्ड अॅक्टिव्हेट केले असल्याचे सांगितले. या गुन्ह्याचा तपास करण्यामध्ये युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, बबन जगताप, सुभाष पुजारी, किरण भोसले, अनिल पाटील, सुनील साळुंखे, विजय आयरे, राकेश मोरे, महेश चव्हाण, पद्मसिंह पवार, संजय पाटील, जगदीश पाटील, प्रमोद पाटील, सुनील कानगुडे, परेश म्हात्रे, विनोद पाटील, सम्राट डाकी, अभय सागळे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)