तरुणाईच्या पॉकेटमनीतून दिला वंचितांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2016 02:24 AM2016-02-03T02:24:09+5:302016-02-03T02:24:09+5:30
मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील तरुणांनी कॉलेजला जाताना आई - वडिलांकडून मिळणाऱ्या पॉकेटमनीचा समाजसेवेसाठी उपयोग करण्याचा निर्धार केला आहे.
नवी मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील तरुणांनी कॉलेजला जाताना आई - वडिलांकडून मिळणाऱ्या पॉकेटमनीचा समाजसेवेसाठी उपयोग करण्याचा निर्धार केला आहे. हेल्पिंग हँड ग्रुपच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थी, अनाथ मुलांसह वंचितांना धान्य व इतर वस्तू उपलब्ध करून देत आहेत. या तरुणांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेणारे तरुण पालकांकडून रोज पॉकेटमनी घेत असतात. या पैशातून हॉटेलमध्ये पार्टी, ट्रीप व इतर गोष्टींवर खर्च केला जातो. १८ वर्षे पूर्ण न झालेले तरुणही धूमस्टाईल मोटारसायकल चालवत असतानाचे चित्र प्रत्येक महाविद्यालयाच्या परिसरात दिसते.
पॉकेटमनीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे वास्तव असताना मुंबई, नवी मुुंबई , ठाणे, कल्याण परिसरातील तरुणांनी वाचविलेल्या पैशातून समाजसेवा सुरू केली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात भीक मागणाऱ्या मुलांचे दु:ख न पहावल्याने या विद्यार्थ्यांनी हेल्पिंग हँड ग्रुप तयार केला. पालकांनी दिलेले पैसे वाचवून या मुलांना खाऊ व इतर खाद्यपदार्थ देण्यास सुरवात कली. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला असून यामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या वाढू लागली आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम व आदिवासींसाठी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आहेत. परंतु यानंतरही प्रत्येक वंचितापर्यंत मदत पोहचत नाही. ज्यांना कोणाचीही मदत मिळत नाही अशा गरजूंना मदत पोहचविण्यासाठी हे तरुण प्रयत्न करत आहेत.
रेल्वे स्टेशन व इतर ठिकाणी असणाऱ्या अनाथ मुलांपासून सुरू केलेल्या या कामाची व्याप्ती वाढू लागली आहे. हेल्पिंग हँडची टीम सुटी मिळाली की आदिवासी गावांमध्ये जावून तेथील मुलांना खेळ, गाणी शिकविण्याचे काम करत आहे. या मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ देते.
नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या बहाण्याने सर्वत्र जल्लोष केला जातो. या पार्ट्यांमुळे तरुणांना दारूचे व्यसन लागत असून अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते. नववर्षाचे स्वागत विधायक कामाने साजरे करण्यासाठी या सर्वांनी मारीया या अनाथ संस्थेला भेट दिली. दिवसभर या मुलांना विविध खेळ व गाणीही शिकविण्यात आली. वाढदिवसानिमित्त मित्रांना पार्टी देण्यापेक्षा वृद्धाश्रमात जावून तेथील आजी - आजोबांच्या सोबत वाढदिवस साजरा केला जात आहे. तरुणांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (प्रतिनिधी)