नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेकाप आघाडी व भाजपामध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. एकमेकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. दोन्हीकडून पक्षनिष्ठा, विचारसरणीपासून कार्यशैलीवरही जोरदार टीका होवू लागली आहे. सोशल मीडियाचाही प्रभावी वापर सुरू झाला असून विकासाच्या मुद्द्यांपेक्षा आरोपांनाच जास्त प्राधान्य मिळू लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी फक्त १४ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. प्रचारासाठी उमेदवार व नेत्यांसाठी अत्यंत कमी कालावधी मिळाला आहे. यामुळे सोशल मीडिया, जाहीर सभांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पक्षाची भूमिका मतदारांपर्यंत पोहचविण्याबरोबरच प्रतिस्पर्धी पक्षांवर टीकेची एकही संधी सोडली जात नाही. निवडणुकीमधील प्रमुख पक्ष असलेल्या शेकाप, काँगे्रस व राष्ट्रवादीकडून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका सुरू झाली आहे. रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर हे स्वार्थासाठी प्रत्येक पाच वर्षांनी पक्ष बदलत आहेत. दोन वेळा आमदार होवूनही प्रशांत ठाकूर यांना तालुक्याचा विकास करता आलेला नाही. त्यांनी केलेली कामे दाखवावी असे आव्हान दिले जात आहे. वडाळे तलावातील गाळ काढण्याच्या कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरूनही टीका सुरू झाली आहे. खारघरचा टोल बंद करण्यासाठी आमदारकीच्या राजीनाम्याचे नाटक करून भाजपामध्ये प्रवेश केला व पुढील दोन महिन्यात उरण परिसरातील दोन टोलनाक्यांची कंत्राटे मिळविल्याचा आरोपही केला जात आहे. दुसऱ्यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्यात भाजपा आघाडीवर असल्याची टीकाही शेकाप नेते विवेक पाटील व इतरांनी सुरू केली आहे. शेकाप आघाडीच्या टीकेला भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली आहे. कळंबोली, कामोठे ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली जात आहेत. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या खुर्च्यांपासून इतर कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची कागदपत्रे आमच्याकडे असल्याचेही ठाकूर यांनी जाहीर केले आहे. आम्ही जनतेच्या सोबत आहोत. वैयक्तिक स्वार्थासाठी कधीच पक्ष बदललेला नाही. टीका करणाऱ्या शेकापचाच आता शेतकरी व कामगारांशी काहीही संबंध राहिलेला नाही. मूळ विचारधारेपासून शेकाप भरकटली असल्याची टीका केली जात आहे. पनवेल महापालिका २५ वर्षांपूर्वीच स्थापन झाली असती तर मनपा क्षेत्र स्मार्ट सिटी झाले असते. परंतु तेव्हा नगरपालिकेची सत्ता असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची इच्छाशक्ती नसल्याने तालुक्याचा विकास रखडल्याची टीका करण्यात येत आहे. रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आम्ही महापालिका स्थापन करण्यासाठी पाठपुरावा केला असल्याचेही भाजपाकडून सांगितले जात आहे. दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी जोरदार टीकासत्र सुरू केले असून यामध्ये शहरवासीयांची करमणूक होवू लागली आहे.
निवडणुकीच्या रणांगणात आरोपांच्या फैरी सुरू
By admin | Published: May 11, 2017 2:21 AM