पनवेल : महापालिका निवडणुकीसाठी पनवेलमधील सर्व पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या निवडणुकीत शेकाप आणि भाजपामध्येची खरी लढत होणार असल्याने या दोन्ही पक्षांनी आपापल्या परीने मतदारांना आकर्षित करण्याचा धडाका लावला आहे. खारघर हा महापालिका क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा नोड आहे. या विभागात तीन प्रभागांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपा आणि शेकापमध्ये या विभागात खऱ्या अर्थाने वर्चस्वाची लढाई होणार आहे. पूर्वाश्रमीच्या खारघर ग्रामपंचायतीवर शेकापची एकहाती सत्ता होती. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेकापसमोर खारघर कॉलनी फोरम वगळता कोणाचेच आव्हान नव्हते. परंतु आता खारघर शहरातील चित्र बदलले आहे. शेकापसमोर आता भाजपाचे कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी या क्षेत्रावर आपले अधिक लक्ष केंद्रित केले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा लीना गरड यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना खारघरमध्ये आणून येथील गोखले शाळेजवळील मैदानात शेतकरी पुत्र मेळावा भरवला होता. लीना गरड या भाजपाच्या प्रभाग क्र मांक ५ मधून इच्छुक उमेदवार आहेत. विशेष म्हणजे त्यानंतर लगेच शेकापने देखील याच ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांची सभा घेवून भाजपाच्या मेळाव्याला जशास तसे उत्तर दिले. या प्रभागातून शेकापच्या वतीने संजय घरत, सोमनाथ म्हात्रे, सीमा घरत हे इच्छुक आहेत. लीना गरड यांनी खारघर कॉलनी फोरमचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच त्यांनी अलीकडेच भाजपात प्रवेश केल्याने या क्षेत्रात पक्षाची ताकद वाढली आहे. या प्रभागातून शेकापच्या वतीने निवडून येऊन थेट सरपंचपदी विराजमान झालेल्या वनिता विजय पाटील या देखील भाजपात गेल्याने शेकापची काही प्रमाणात कोंडी झाली आहे. भाजपाच्या वतीने या प्रभागात युवा मोर्चाचे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, रामजी भाई पटेल,मामा मांजरेकर, अमर उपाध्याय, शंकर शेठ ठाकूर हे इच्छुक आहेत. खारघर शहरातील सर्वात मोठा असलेल्या प्रभाग क्रमांक ६ मधून देखील दोन्ही पक्षाकडून अनेक इच्छुक उमेदवार आहेत. भाजपाकडून अॅड.नरेश ठाकूर , प्रीती ठोकले, सुरेश ठाकूर ,दत्ता वर्तेकर, कीर्ती नवघरे,शेकापमधून भाजपामध्ये आलेले नीलेश बाविस्कर, सेनेतर्फे मनेश पाटील, रामचंद्र देवरे, रोशन पवार, यशोदा गायकवाड आदी इच्छुक आहेत. तर शेकापकडून संतोष गायकर, अशोक गिरमकर, उषा आडसुळे,राष्ट्रवादीच्या अॅड. संध्या शारिबद्रे, दत्ता ठाकूर,मंजुळा तांबोळी,अंजनी ठाकूर आदींचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपाच्या वतीने ब्रिजेश पटेल, अभिमन्यू पाटील,प्रवीण पाटील, अनंता तोडेकर, नेत्रा किरण पाटील, बिना जयेश गोगरी , वनिता वासुदेव पाटील आदींनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर शेकाप महाआघाडीच्या वतीने गुरु नाथ गायकर, काँग्रेसतर्फेरूपेश घरत,नितीन भगत, विनोद पटेल आदींची नावे चर्चेत आहेत. सेनेतर्फे गुरु नाथ पाटील, जयेश कांबळे हे तर मनसेतर्फे कुंदा केसरीनाथ पाटील,प्रणिता प्रकाश परब हे इच्छुक आहेत. भाजपा-सेनेच्या युतीवर देखील अनेक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. विशेष म्हणजे खारघर शहरात खरी लढाई शेकाप-भाजपामध्येच आहे. याकरिता दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. त्यानुसार शहरात राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे. मतदारांची मने जिंकण्यासाठी प्रत्येक इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. (प्रतिनिधी)
भाजपा-शेकापमध्ये वर्चस्वाची लढाई
By admin | Published: April 24, 2017 2:40 AM