सावध रहा, संयम बाळगा, दंगल घडविण्याचा प्रयत्न करतील; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन
By नामदेव मोरे | Published: November 20, 2023 11:15 PM2023-11-20T23:15:23+5:302023-11-20T23:15:58+5:30
१ डिसेंबर पासून पुन्हा साखळी उपोषण; माझा जीव गेला तरी आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे न हटण्याचा निर्धार
नवी मुंबई: मराठा समाजाला आरक्षण भेटणारच आहे. लढाई निर्णायक टप्यावर आली आहे. काहीजण दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतील. पण संयम बाळगा, सावध रहा आपणास शांततेने लढा द्यायचा आहे. माझा जीव गेला तरी चालेल पण आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. १ डिसेंबर पासून पुन्हा साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. २४ डिसेंबर ला आरक्षण दिले नाही तर मुंबईत धडक देण्याचा इशाराही दिला.
नवी मुंबईतील घणसोली येथे सकल मराठा समाजाच्यावतीने सभेचे आयोजन केले होते. सर्व मराठा बांधवांनी निर्णायक लढ्यात योगदान द्यावे. घरोघरी जाऊन जनजागृती करावी. आरक्षणाची फाईल सरकारच्या टेबलावर आहे. २४ डिसेंबर ला आरक्षण मिळणार आहे. सरकारने मुदतीत आरक्षण दिले नाही तर २५ डिसेंबर ला पुढील लढ्याची दिशा ठरविली जाईल. आम्हाला मुंबई ला यायचे नाही. पण निर्णय झाला नाही तर आम्हाला मुंबईत यावे लागेल. मंत्रालय बघायला लागेल. येथे लय विमाने उडतात. आम्हाला विमाने बघावी लागतील असा इशाराही दिला.
मराठा आरक्षणाच्या आड जो येईल त्याला सुट्टी नाही. पण आता लढा शेवटच्या टप्यात आला असल्याने सगळ्यांनी संयम बाळगावा. शांततेत आंदोलन सुरू ठेवायचे आहे. छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्याचे वय झालय त्याला किंमत देऊ नका. दंगल फडकविण्याची भाषा करणारांपासून सावध रहा. हा काय काय खातो आम्हाला माहिती आहे. मुंबईत कधी आला,काय खाल्ले कुठे खाल्ले माहिती आहे. एकदा आरक्षणाचा प्रश्न सुटू द्या मग त्याच्याकडे पाहू असेही स्पष्ट केले. ओबीसी व मराठे एकदिलाने राज्यात रहात आहेत.त्यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आता आपण शांततेने लढा सुरू ठेवायचा. कुठेही शांतता भंग होऊ द्यायची नाही. माझ शरीर थकलय. पण आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. तुम्हीपण जागे रहा. घराघरात जनजागृती करा असे आवाहन ही केले. मराठा समाज ओबीसीत गेल्यात जमा आहे. म्हणून काहीजण भांडणे लावत आहेत.पण संयम धरा लढाई आपणच जिंकणार आहोत असे स्पष्ट केले.
आरक्षणापासून वंचित कोणी ठेवले.
मराठा समाजाने सर्वांवर विश्वास ठेवला पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. यापुढे आरक्षणापासून कोणी वंचित ठेवले ते पण तपासू. सर्व मराठा समाजाचा फायदा होईल आरक्षण मिळेल असा कायदा हवा.ज्यामध्ये मराठ्यांचे हित नाही तो कायदा मान्य नाही असेही स्पष्ट केले.
दहा हजार मोबाईल चा प्रकाश
सभेला उपस्थित नागरिकांना मोबाईल चा प्रकाश पाडण्याचे आवाहन केले. एक क्षणात दहा हजार मोबाईल च्या प्रकाशाने मैदान उजळून निघाले