‘नैना’त घरे घेताना सावधान!
By admin | Published: July 23, 2015 03:51 AM2015-07-23T03:51:19+5:302015-07-23T03:51:19+5:30
सिडकोच्या नैना क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. कोणतीही परवानगी न घेता सर्रास टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत
नवी मुंबई : सिडकोच्या नैना क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. कोणतीही परवानगी न घेता सर्रास टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. या बेकायदा इमारतीतील घरे गरजूंच्या माथी मारून त्यांची फसवणूक केली जात आहे. याविरोधात आता सिडकोनेच कंबर कसली असून नैना क्षेत्रात घरे किंवा कोणतीही मालमत्ता विकत घेताना नागरिकांनी त्याची वैधता तपासून पाहावी, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.
नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्ल्युअन्स नोटीफाइड एरिया (नैना) अर्थात नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रात सिडकोच्या माध्यमातून एक नवे शहर लवकरच आकारास येऊ घातले आहे. सुमारे ५६१.७२ चौरस किलोमीटर क्षेत्रात ‘नैना’ प्रकल्प आकारास येणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या सुमारे २५ किमी चौरस परिघातील २७० गावांच्या क्षेत्रातील जमीन शासनाने यासाठी आरक्षित केली आहे. यात रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण या तालुक्यातील २५६ तर ठाण्यातील १४ गावांचा समावेश आहे.
या संपूर्ण क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून सरकारने सिडकोची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कोणत्याही बांधकामासाठी सिडकोची परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे असले तरी अनेकांनी कोणतीही परवानगी न घेता बांधकामांचा धडाका चालविला आहे. तर विकास परवानगी मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असल्याच्या बतावणी करून काहींनी आपल्या बेकायदा गृहप्रकल्पातील घरे विकण्याचा सपाटा लावला आहे.
विशेष म्हणजे सध्या या क्षेत्रात सुरू असलेल्या बहुतांशी गृहप्रकल्पांच्या विकासकांनी परवानगीसाठी सिडकोकडे कोणताही प्रस्ताव पाठविला नसल्याचे दिसून आले आहे. असे असतानाही मोठमोठे फलक लावून व जाहिरातबाजी
करून अनधिकृत घरे विकण्याचा गोरखधंदा तेजीत सुरू असल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. अशा बेकायदा गृहप्रकल्पांतून नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता सिडकोनेच पुढाकार घेतला आहे.
या क्षेत्रात उभारण्यात येत असलेल्या कोणत्याही गृहप्रकल्पात घरे किंवा दुकाने विकत घेताना नागरिकांनी सदर बांधकामाला परवानगी आहे का, याची संबंधित विभागाकडून खातरजमा करून घ्यावी, फसवणूक टाळण्यासाठी प्रकल्पाची वैधता आणि सत्यतेची पडताळणी करण्याची पूर्णत: जबाबदारी संबंधित खरेदीदाराची असणार आहे. विकासकाकडून झालेल्या कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला सिडको जबाबदार राहणार नाही, असे सिडकोच्या वतीने घरे खरेदी करणाऱ्यांना स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)