कोणत्याही पक्षात राहा, पण ओबीसींच्या प्रश्नांसाठी एकत्र या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 11:34 AM2022-09-20T11:34:33+5:302022-09-20T11:34:42+5:30
कृतज्ञता मेळावा; छगन भुजबळ यांचे ओबीसी नेत्यांना आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ओबीसी नेत्यांनी कोणत्याही पक्षात राहावे; पण समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी येथे केले. २७ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. ओबीसीची जनगणना झाली पाहिले, अशी मागणी करून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
नवी मुंबईमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ओबीसी कृतज्ञता मेळावा झाला. छगन भुजबळ म्हणाले की, देशात समाजाची ५४ टक्के लोकसंख्या आहे. समाजाला २७ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. शरद पवार यांनी देशात सर्वप्रथम मंडल आयोग स्वीकारला. त्यांनी नेहमीच ओबीसींचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. ओबीसी नेते विविध पक्षांमध्ये काम करत आहेत. पक्ष कोणताही असू द्या समाजाच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. समाजाच्या प्रश्नांसाठी लवकरच पुन्हा रस्त्यावर उतरून लढा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, असा आग्रह धरला. देशाचे राजकारण ताब्यात ठेवण्याची ताकद समाजामध्ये आहे. संघर्ष करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आमदार शशिकांत शिंदे यांनीही राष्ट्रवादी सर्वांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे राज राजापूरकर, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, राजू शिंदे, संदीप सुतार, जी. एस. पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
...तर रोजगारासाठी भटकावे लागेल
जितेंद्र आव्हाड यांनी वेदांता व इतर उद्योग गुजरातला गेल्यावरून सरकारवर टीका केली. उद्योगांचे असेच स्थलांतर होत राहिले तर महाराष्ट्रातील तरुणांना उत्तर प्रदेश, बिहार प्रमाणे राज्यातील तरुणांना रोजगारासाठी इतर राज्यात जावे लागेल, असे मतही व्यक्त केले.
तरुणांचा रोजगार हिसकावला
आमदार रोहित पवार यांनी वेदांतासह अनेक कंपन्या गुजरातला गेल्या. गुजरातच्या हितासाठी बुलेट ट्रेनचा आग्रह धरला जात आहे. उद्योगांच्या स्थलांतरामुळे तरुणांच्या हक्काचा रोजगार हिसकावला असल्याची टीकाही त्यांनी केली.