लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : चाळीस हजाराच्या आर्थिक व्यवहारातून बापलेकासह मित्राला मारहाण झाल्याची घटना घणसोली गावात घडली आहे. व्यवहारावर चर्चेसाठी भेटीला बोलावून तक्रारदाराला डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने निसटण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करून लाकडाने मारहाण करण्यात आली.
घणसोली गावात गुरुवारी रात्री हा प्रकार घडला आहे. रबाळे येथे राहणारे जेम्स पॉल यांचा संकेत सरडे याच्यासोबत चाळीस हजाराचा आर्थिक व्यवहार होता. त्यापैकी १० हजार रुपये गुरुवारी जेम्सने परत केले होते. मात्र उर्वरित ३० हजार रुपये परत करण्यासाठी मुदत मागितली होती. याचदरम्यान त्यांच्या घरात घुसून अज्ञाताने वडील जॉन पॉल यांना मारहाण करून घरातील साहित्याची तोडफोड केली होती. याबाबत ते तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आले असतानाच त्यांना भेटीसाठी माजी नगरसेवकाच्या कार्यालयात बोलवण्यात आले. मात्र कार्यालय बंद असल्याने त्यांच्यात कार्यालयाबाहेरच चर्चा सुरु असताना तिघांनी जेम्स व त्यांचा मित्र विक्रम सिंग यांना मारहाण सुरु केली.
शिवाय जेम्स याला डांबून ठेवण्याचाही प्रयत्न झाला. यावेळी दोघेही त्यांच्या तावडीतून सुटत असताना त्यांना लाकडी फळ्यांनी मारहाण झाली असता त्यात ते जखमी झाले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार कृष्णा कोळी, लतिकेश पाटील व हेमंत पाटील विरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास रबाळे पोलिस करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"