- कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यातील मानिवली गावाचे सुपुत्र हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचे स्मारक मानिवली गावात बांधण्यात आले आहे. शासनाने बांधलेल्या हुतात्मा स्मारकाचा कायापालट करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मानिवली ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्मारक परिसर सुशोभित करण्यात येत आहे.
क्रांतिकारक गोमाजी पाटील यांचे सुपुत्र हिराजी हे मानिवली गावी राहत होते. मात्र, पित्याला शोधण्यात अपयश आल्याने त्यांचे पुत्र हिराजी यांना ब्रिटिशांनी पकडून नेले. मात्र, क्रांतिकारकाचा मुलगा शांत राहू शकत नाही, हे हिराजी यांच्या कृतीने दिसून आले. पुढे भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील यांच्या लठ्यात सामील झालेले हिराजी यांना २ जानेवारी १९४३ मध्ये वीरमरण आले. तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले यांच्या काळात हौतात्म्य आलेल्या सर्व हुताम्यांची स्मारके उभारली गेली. त्यात मानिवली येथे हिराजी गोमाजी पाटील यांचे स्मारक उभारले गेले होते.
पाच एकर जागेत वसलेल्या त्या स्मारकात सर्व जागेचा वापर व्हावा, यासाठी अनेक उपक्रम राबविले गेले आहेत. त्यात सभागृह, बालकांसाठी अंगणवाडी, खुले रंगमंच यांची निर्मिती शासनाच्या वेगवेगळ्या निधीमधून करण्यात आली होती. संपूर्ण जागेला दगडी कुंपण असलेले मानिवली येथील हुतात्मा स्मारक राज्यातील काही आघाडीच्या स्मारकात नोंद होईल असेच आहे.
मात्र, गावातील हुतात्मा स्मारक सुशोभितकरण्यासाठी मानिवली ग्रुप ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. सरपंच प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून स्मारक परिसरात बदल केले जात आहेत. परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली असून, त्या झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते. प्रवेशद्वारालगत प्रशस्त उद्यान विकसित केले जात आहे. त्या सर्व कामांबरोबर वाहनतळही पेव्हर ब्लॉक लावून बनविला जात आहे. सर्व कामे मानिवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येत असून बलिदान दिनी म्हणजे १ जानेवारी २०१० रोजी साजऱ्या होणाºया कार्यक्रमापूर्वी कामे पूर्ण होतील, अशी माहिती प्रवीण पाटील यांनी दिली आहे.