शिल्पांच्या परिसराचे सुशोभीकरण!
By admin | Published: November 17, 2016 05:40 AM2016-11-17T05:40:14+5:302016-11-17T05:40:14+5:30
खारघर शहराचे प्रवेशद्वार म्हणून हिरानंदानी उड्डाणपूल परिसर ओळखला जातो.
वैभव गायकर
पनवेल : खारघर शहराचे प्रवेशद्वार म्हणून हिरानंदानी उड्डाणपूल परिसर ओळखला जातो. सिडकोने शहराचा विकास अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केला आहे. यानुसार सिडको कार्यालयाच्या मागील बाजूस शहराच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेले हे शिल्प हस्तकलेचा सुंदर असा नमुना होते. मात्र, या शिल्पाजवळूनच स्कायवॉक प्रकल्प गेल्याने हे शिल्प एका बाजूला पडले असून दिसेनासे झाले आहे. मात्र, सिडकोने या परिसराचा विकास करण्याचे ठरविले असून ही शिल्पअसलेल्या परिसरात उद्यान विकसित केले जाणार आहे. यामुळे पुन्हा एकदा या शिल्पांना नवसंजीवनी देण्याचे काम केले जाणार आहे.
सध्याच्या सिडकोच्या विभागीय कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या भूखंड क्र मांक २२, २३ वर ही शिल्पे आहेत. या शिल्पांना आणखीनच उठावदार दिसण्यासाठी या भूखंडाचा सर्वांगीण विकास सिडको करणार आहे. पाच हजार स्केअर मीटरचा असा हा भूखंड असून या ठिकाणी चिल्ड्रन प्ले एरिया, लॉन, गझेबो (बसण्यासाठी शेड), वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे रोपण आदींसह विविध मनोरंजनात्मक साहित्य या ठिकाणी बसविले जाणार आहे. याकरिता तीन महिन्यांपूर्वीच एका खासगी कंपनीला हे टेंडर देण्यात आले आहे. याकरिता सुमारे १ कोटी ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सिडकोच्या वतीने सांगण्यात आले आहे. खारघर शहरामध्ये गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क यासह महत्त्वाकांक्षी प्रकल्प उत्सव चौक, शिल्प चौक अशाप्रकारच्या कलाकृती उभारल्या आहेत. त्यापैकीच हे शिल्प एक असून त्याची किंमतही लाखोंच्या घरात आहे. या शिल्पांच्या परिसराला विकसित करून शिल्पही याच ठिकाणी दर्शनीय भागात स्थलांतरित करण्याचा आमचा विचार असल्याचे खारघरमधील सिडकोचे प्रशासक प्रदीप डहाके यांनी सांगितले. या ठिकाणी बांबूसारख्या विविध शोभेच्या झाडाचे रोपण करून आम्ही परिसर आणखीनच सुंदर करणार आहोत. येणाऱ्या नागरिकांनाही या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करणार आहोत त्यामुळे ही कलाकृती जवळून पाहता येणार असल्याचे डहाके यांनी सांगितले.