पर्यटकांना भुरळ घालणारे निसर्ग सुंदर माथेरान!
By admin | Published: June 19, 2017 05:06 AM2017-06-19T05:06:38+5:302017-06-19T05:06:38+5:30
माथेरानला निसर्गाच वरदहस्त लाभला असून, पावसाळ्यातील चार महिने संपूर्ण माथेरानच्या आजूबाजूच्या परिसरात व डोंगरकुशीत धुक्याची पांढरी चादर पसरलेली अस
मुकुंद रांजणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : माथेरानला निसर्गाच वरदहस्त लाभला असून, पावसाळ्यातील चार महिने संपूर्ण माथेरानच्या आजूबाजूच्या परिसरात व डोंगरकुशीत धुक्याची पांढरी चादर पसरलेली असते. त्यामुळे येथील निसर्गाची शोभा पर्यटकांना भुरळ टाकल्याशिवाय राहत नाही. जून महिन्यात पावसाची चाहूल लागताच पिकनिकच्या योजना आखल्या जातात. विशेष ट्रेकिंगसाठी माथेरानला पसंती दिली जाते. अशा लोकांसाठी माथेरान हे सुरक्षेच्या दृष्टीने एक आदर्श पर्यटनस्थळ म्हणून मागील काही वर्षांमध्ये प्रसिद्धीस आले आहे.
अगदी मुंबई-पुण्यापासून जवळच असलेले, तसेच माथेरानच्या कुशीत वसलेली काही जवळची शहरे यांना जवळचे ठिकाण म्हणजे रायगडची शान माथेरान. पावसाळी आनंद काही वेगळाच असतो. तीन महिने तर तेथील झाडाझुडपांवर जणू निसर्गाने धुक्याची चादर पसरलेली असते. त्यामुळे पर्यटकही आनंदित असतात. समुद्र सपाटीपासून २६५६ उंच असल्याने साहजिकच खोलवर दऱ्या-कपाऱ्या आहेत.
पॉइंटवरून दूरवर पाहिलेकी नदी-नाले डोंगर दिसत असून, त्यावरून पांढरे फेसाळ वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत असतात. अगदी माथेरानच्या पूर्वेस नजर टाकली की, मध्य रेल्वेचे नेरळ स्टेशन लागते. त्या ठिकाणी उतरल्यास नेरळ स्टेशन समोरच माथेरानचे दर्शन घडते. तेथून पर्यायी मार्ग म्हणजे नेरळ माथेरान टॅक्सी सर्विस किंवा स्वत:ची वाहने असतील, तर कर्जत मार्गे माथेरान.
हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यातून डोंगराच्या वळणदार घाट रस्त्यातून काही कंपनी ग्रुप तरु णाईचे ग्रुप ट्रेकिंग करीत मध्ये वॉटर पाइप या ठिकाणी मोठा धबधबा असल्याने धबधब्याची मजा घेत, दस्तुरी मार्गे माथेरानला येता येते. माथेरानला आल्यावर ३८ पॉइंटची वर्षा सहल पर्यटकांसाठी पर्वणीच असून, प्रत्येक पॉइंटवरु न वेगवेगळी नयनरम्य दृश्य न्याहाळण्यास मिळतात.
येथील काही अडचणीचे मार्ग असतील त्या ठिकाणी शक्य तो जाणे टाळावे. येथील वनसंपदा व येथील शार्लोट लेकवरील धबधबा पर्यटकांना ओलेचिंब होण्यासाठी मोह करीत असतो. एक दिवसाच्या सुट्टीत तर शेकडो पर्यटक लेकच्या पांढऱ्या फेसाळ धबधब्याचा आनंद घेत असतात. शनिवारी-रविवारी इको पॉइंट, शार्लोट लेक, खंडाळा पॉइंट, वन ट्री हिल या ठिकाणी पर्यटकांची जणू जत्राच भरलेली असते. माथेरान टेबल लॅड पॉइंट लुईझा या ठिकाणांहून पनवेल, रसायनी, मोर्बे धरण या ठिकाणी न्याहाळण्यास मिळतात.