पनवेल: खारघर येथील पांडवकडा या निसर्गरम्य स्थळाचे सौंदर्यीकरण व विकासाच्या अनुषंगाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून पांडवकड्याच्या विकासासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली? अशी विचारणा केली.पनवेल तालुक्यातील खारघर येथील पांडवकडा या निसर्गरम्य स्थळाच्या पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने सौंदर्यीकरण व विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सह सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे निवदेनाद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. पांडवकडा हा पावसाळी धबधब्यासाठी तसेच निसर्गरम्य वनराईसाठी प्रसिद्ध असून, दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक भेट देत असले, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने व पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.या स्थळाचे सुशोभीकरण व विकास केल्यास स्थानिक भूमिपुत्रांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होणार असल्याने याकरिता निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल करून त्या संदर्भात विचारणा केली.राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले की, नवी मुंबईमधील खारघर येथील पांडवकडा धबधब्याच्या परिसरात पक्क्या स्वरूपाचा पोहोच रस्ता नसल्याने धबधब्याजवळ जाण्याकरिता सुरक्षित पायवाट, रेलिंग, उपाहारगृह, प्रसाधनगृह, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी सोयी-सुविधा नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. सबब, सिडको या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून संकल्पनात्मक नकाशा तयार केला असून त्यानुसार १.५ कि.मी. लांबीचा रस्ता, पार्किंग, शौचालय, लॉकर सुविधा, लाकडी मचान इत्यादी सोयी उपलब्ध होणार आहेत.
पांडवकडा परिसराचे सुशोभीकरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 12:26 AM