आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्या त्रासामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, अशोक गावडे यांचा गंभीर आरोप
By नारायण जाधव | Published: September 7, 2022 08:53 PM2022-09-07T20:53:18+5:302022-09-07T20:55:56+5:30
पक्षाचे काम करित असताना पक्षातील वरिष्ठांचे आपणास सहकार्य व मार्गदर्शन लाभले नाही, गावडे यांनी व्यक्त केली खंत.
“नवी मुंबई बाहेरील व्यक्ती जिल्हा काँग्रेस कमिटीत धावलढवक करित होत्या. जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, प्रशांत पाटीलसह भावना घाणेकर यांनी पक्षात सातत्याने गटातटाचे राजकारण केले. नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील आणि नवी मुंबई राष्ट्रवादी काँगेसच्या महिला निरीक्षक भावना घाणेकर यांनी वर्षभपासून मला विश्वासात न घेता परस्पर बैठका घेऊन माझ्याविषयी कार्यकर्त्यांत गैरसमज पसरवले. पक्षाचे काम करित असताना पक्षातील वरिष्ठांचे आपणास सहकार्य व मार्गदर्शन लाभले नाही,” याचे तत्कालीन जिल्हा अध्यक्ष माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी बुधवारी नेरुळ येथे बोलताना सांगितले.
आपण नाईलाजास्तव राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा ३० ऑगस्ट २०२२ रोजीच राष्ट्रीय पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. पक्ष सोडताना आपल्यासाठी सर्व पक्षांची द्वारे खुली असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्या अध्यक्ष आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्या अध्यक्षपदी नामदेव भगत यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद तीन वर्षांपूर्वी आपण स्वीकारले होते. पक्ष वाढीसाठी जीवाचे रान केले. स्वतःचा पैसे खर्च केला. पक्ष वाढीसाठी करत असलेल्या कार्याचा अहवाल आपण जयंत पाटील, अजित पवार , खा. सुप्रिया सुळे यांना वेळोवेळी सादर केला. मात्र पक्षातील वरिष्ठांकडून आपणास मार्गदर्शन व सहकार्य लाभले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.
वरिष्ठांनी जिल्हा अध्यक्ष म्हणून आपणास विश्वासात न घेता नवी मुंबई बाहेरील व्यक्तींना माझ्या डोक्यावर आणून बसवले. आपणास पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, शशिकांत शिंदे, प्रशांत पाटील, भावना घाणेकर, नामदेव भगत यांनी सातत्याने त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी गटबाजी आणि गटातटाच्या राजकारणास खतपाणी घातले. नवी मुंबई शहरात अध्यक्ष बदली करावा यासाठी दिवसातून चार चार बैठका ते घेत असत. त्यामुळे माझा स्वाभिमान दुखावला गेल्याची खंत गावडे यांनी व्यक्त केली.
'बदनाम करण्याचे प्रयत्न'
मला येनकेन प्रकारे बदनाम करण्याची मोहिमच काहींनी उघडली होती. नवी मुंबईतून कार्यकर्त्यांची वेगवेगळी शिष्टमंडळे वरिष्ठांकडे पाठवून मला जिल्ह्याध्यक्ष पदावरून काढण्याचे प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच नाईलाजास्तव आपण आपला राजीनामा शरद पवार यांच्याकडे पाठवला असल्याचे सांगितले. नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे पत्र जयंत पाटील यांनाही पाठवले असल्याचे गावडे म्हणाले.