पनवेल : युवकांनी नावीन्यपूर्ण कौशल्य आत्मसात करून त्याआधारे उद्योजक बनावे आणि इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे मार्गदर्शन रामशेठ ठाकूर यांनी पनवेलमध्ये आयोजित कार्यक्रमात केले. रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाउन आणि रोट्रॅक्ट क्लब यांच्या संयुक्त पुढाकाराने वायएसआयए अर्थात यंग सोशल इनोव्हेटर अॅवॉर्ड या अभिनव उपक्रमाचा दुसºया वर्षाचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला. या वेळी लेखक अच्युत गोडबोले प्रमुख वक्ता म्हणून तर पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यंग सोशन इनोव्हेटर अॅवॉर्ड उपक्रमांतर्गत १६ ते ३० वयोगटातील विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक अथवा पाच जणांच्या गटाकडून, त्यांची अभिनव कल्पना श्वेतपत्रिकेद्वारे मागविण्यात येते. त्यानंतर परीक्षक त्यातून दहा प्रकल्पांची निवड करतात आणि त्याचे सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना बोलवितात. त्यातून अंतिम तीनची निवड करून त्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते.
यंदा भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थी गटाचे संकेत अहिरे, तेजस भाडे, ऋषीकेश भागवत व सर्वेश सानप या विद्यार्थ्यांना पहिल्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. दुसरा क्रमांक पुण्याचा प्रसाद शेठ यास हेल्थ स्कॅन कार्डसाठी आणि अक्षता पटेल व रोहन कुमार यांना प्रायोजिक तत्त्वावर बनवलेल्या वेब अप्लिकेशनसाठी तृतीय क्रमांक मिळाले. अध्यक्ष विक्रम धुमाळ यांनी महापालिकेने केलेल्या सहकार्याबद्दल अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांचे आभार मानले. तर योगिता देशमुख यांनी उद्योजकता विकासाच्या दिशेने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.