बेवारस वाहने उचलण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:34 AM2021-01-12T00:34:39+5:302021-01-12T00:34:53+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेची कारवाई
नवी मुंबई : शहर विद्रुपीकरण रोखण्यासाठी महानगरपालिकेने धडक माेहीम सुरू केली आहे. रोडवरील बेवारस वाहने उचलण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत होर्डिंगवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. एकाच वेळी आठही विभाग कार्यालय परिसरात ही कारवाई केली जात आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी महानगरपालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरातील भिंती, उड्डाणपूल, विद्युत रोषणाई, शिल्पाकृती, कारंजे या माध्यमातून शहर सुशोभीत केले जात आहे, परंतु दुसरीकडे अनधिकृत होर्डिंग व रोडवरील बेवारस वाहने, यामुळे स्वच्छतेमध्ये अडथळे निर्माण होत होते.
आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी बेवारस वाहने उचलण्याची व विनापरवाना होर्डिंग हटविण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. यामुळे सोमवारी एकाच वेळी शहरात सर्वत्र कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक चौकांमधील होर्डिंग हटविण्यात आले असून, तेथील विद्रुपीकरण थांबले आहे. स्वच्छता अभियानामध्ये नागरिकांचे योगदान हवे आहे. सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी परवानगी घेऊनच होर्डिंग लावावी, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. वाहनेही पार्किंगची सुविधा असलेल्या ठिकाणीच उभी करण्याचे सुचविले आहे.
शहरातील प्रत्येक नागरिकाचे स्वच्छता अभियानामध्ये योगदान हवे आहे. शहर विद्रूप हाेणार नाही, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. पोस्टर्स भित्तिपत्रके कुठेही चिटकवू नयेत.
- अभिजीत बांगर,
आयुक्त महानगरपालिका