स्मार्ट सिटीला भिकाऱ्यांचा विळखा

By admin | Published: December 23, 2016 03:37 AM2016-12-23T03:37:53+5:302016-12-23T03:37:53+5:30

स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या नवी मुंबईला भिकाऱ्यांचा विळखा बसत चालला आहे. पुलाखालील मोकळी जागा त्यांच्यासाठी

The beggars of the smart city | स्मार्ट सिटीला भिकाऱ्यांचा विळखा

स्मार्ट सिटीला भिकाऱ्यांचा विळखा

Next

सूर्यकांत वाघमारे / नवी मुंबई
स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या नवी मुंबईला भिकाऱ्यांचा विळखा बसत चालला आहे. पुलाखालील मोकळी जागा त्यांच्यासाठी आश्रयस्थान ठरत असून, दिवसभर शहरभर विखुरलेले भिकारी रात्रीच्या वेळी त्याठिकाणी घोळक्याने जमत आहेत. त्यापैकी काही जण सुस्थितीत असतानाही अपंगत्वाचे ढोंग करून भीक मागत असल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.
गत काही महिन्यांपासून शहरातील भिकाऱ्यांची संख्या वाढल्याचे पहायला मिळत आहे. दिवसा शहरात ठिकठिकाणी अथवा सिग्नलच्या ठिकाणी भीक मागण्यासाठी विखुरल्यानंतर रात्री मात्र सर्वांना पुलाखालील जागेचा आधार मिळत आहे. यामुळे सानपाडा पुलाखाली, पनवेल एलिव्हेटेड पुलाखाली व पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने भिकारी जमल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत चालले आहे. दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई पोलिसांनी शहरातील भिकाऱ्यांची धरपकड करून बेगर्स होममध्ये रवानगी केली होती. यावेळी भिकाऱ्यांच्या प्रतिकाराचाही त्रास पोलिसांना सहन करावा लागला होता. किळसवाणे कृत्य करून हे भिकारी पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करायचे. त्यानंतरही पोलिसांनी सातत्य ठेवल्याने आयुक्तालय क्षेत्रात काही महिनाभर अशा कारवाया सातत्याने सुरू राहिल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता. त्यामध्ये सर्वाधिक वाशी परिसरातील भिकारी दिसेनासे झाले होते. मात्र कालांतराने भिकाऱ्यांच्या विरोधातली मोहीम थंड पडल्यामुळे शहरात शेकडोंच्या संख्येने भिकाऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. बहुतांश रेल्वे स्थानकांच्या आत व बाहेर, मॉलच्या परिसरात तसेच सिग्नलच्या ठिकाणी हे भिकारी पहायला मिळत आहेत. त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश दिसून येत आहे. ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्याकडून भीक मागितली जात जाते. अनेकदा भीक न दिल्यास त्यांच्याकडून त्रास देखील दिला जात आहे.
तोतया भिकाऱ्यांचा सुळसुळाट-
महत्त्वाच्या शहरांमध्ये भिकाऱ्यांच्या टोळ्या सक्रिय असून त्यांच्या पाठीशी मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. शरीराने धडधाकट असणाऱ्यांना देखील अपंग भासवून त्यांच्याकडून भीक मागितली जात. परंतु भिकाऱ्यांकडून जमा होणारा पैसा नेमका जातो कुठे याचा अद्याप उलगडा झालेला नाही. अशाच एका अपंग भिकाऱ्याची बनवेगिरी सानपाडा रेल्वे स्थानकात उघड झाली. फलाटावर जाण्याच्या मार्गावर अपंगत्वाचा दिखावा करत एक जण भीक मागत बसलेला होता. परंतु त्याच्या दिशेने कॅमेरा फिरवताच त्या व्यक्तीने चक्क पळ काढला. गेल्या अनेक दिवसांपासून ती व्यक्ती त्याठिकाणी अपंगत्वाची सहानुभूती मिळवून भीक मागत होती. अशाच प्रकारे शहरात इतरही अनेक भिकाऱ्यांच्या बनावट टोळ्या सक्रिय असण्याची शक्यता आहे.
नेमकी कारवाई करणार कोण?
शहरातील भिकाऱ्यांवर स्थानिक प्राधिकरण, पोलीस की इतर कोणती यंत्रणा यापैकी नेमकी कारवाई करणार कोण, असा प्रश्न सध्या भेडसावत आहे. हीच समस्या नवी मुंबईसह इतरही महत्त्वाच्या शहरांमध्ये भेडसावत आहे. भिकाऱ्यांवर कारवाईचे ठोस निर्देशच नसल्यामुळे दिवसेंदिवस त्यांचा उपद्रवा वाढत चालला आहे. त्यांच्याकडून पैशासाठी नागरिकांना त्रास दिला जात असल्याने शहरातून भिकारी हटविण्याची मागणी होत आहे. असे असले तरी शहराच्या स्वच्छता व सुरक्षेच्या दृष्टीने भिकाऱ्यांना महापालिकेने अटकाव घालावा, असे जाणकारांचे मत आहे.

Web Title: The beggars of the smart city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.