एपीएमसीमध्ये नव्या वर्षाच्या सुरुवातीला १२५ पेटी हापूस दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 04:54 AM2019-01-20T04:54:06+5:302019-01-20T04:54:23+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हापूसची आवक होऊ लागली आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हापूसची आवक होऊ लागली आहे. शनिवारी सर्वाधिक १२५ पेट्यांची आवक झाली असून, होलसेल मार्केटमध्ये प्रतिपेटीला ३ ते ६ हजार रुपये दर मिळत आहे.
येथील फळ मार्केटमध्ये शनिवारी कलिंगड व पपईची सर्वाधिक ३५७ टन एवढी आवक झाली आहे. सफरचंद, संत्री, मोसंबी, अननस व टरबुजाचीही मोठ्या प्रमाणात आवक होत असली, तरी शनिवारी मार्केटचे लक्ष वेधले ते हापूस आंब्याने. जानेवारीच्या सुरुवातीपासूनच १५ ते २० पेटी आंबा रोज विक्रीसाठी येत आहे. शनिवारी सर्वाधिक १२५ पेट्यांची आवक झाली आहे. देवगडमधून हा आंबा विक्रीसाठी येत असून, त्याला बाजारभावही चांगला मिळत आहे. होलसेल मार्केटमध्ये पाच डझनच्या एक पेटीला ३ ते ६ हजार रुपये भाव मिळत आहे.
बाजार समितीमधील व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे म्हणाले, की आंब्याची कमी, पण नियमित आवक होत आहे. शनिवारी या हंगामातील सर्वात जास्त आवक झाली आहे. मार्चमध्ये खरा हंगाम सुरू होऊन मोठ्या प्रमाणात आवक सुरू होईल.