शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 01:34 AM2019-05-04T01:34:53+5:302019-05-04T01:35:10+5:30
स्वच्छतेत देशात आणि राज्यात क्रमांक पटकाविणाऱ्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात करण्यात आली आहे
नवी मुंबई : स्वच्छतेत देशात आणि राज्यात क्रमांक पटकाविणाऱ्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळी पाण्याचा अडथळामुक्त निचरा व्हावा यासाठी नालेसफाई केली जात असून पावसाळा सुरू होण्याआधी नालेसफाईची कामे पूर्ण केली जाणार आहेत.
जून महिन्यात मान्सूनला सुरु वात होणार असल्याने मे महिन्याच्या अखेरपर्यंत शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. शहरात पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी पदपथाखाली पावसाळी गटारांची निर्मिती करण्यात आली आहे. गटारांमधील कचरा, माती, गाळ यामुळे पावसाळ्यात गटारे ओव्हरफ्लो होऊ नये तसेच शहरात पाणी तुंबण्याच्या घटना घडू नयेत यासाठी दरवर्षी महापालिकेच्या माध्यमातून पावसाळी गटारांची सफाई केली जाते. जून महिन्यात कोणत्याही क्षणी मान्सून सुरू होऊ शकतो त्यामुळे शहरातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा सर्वच नोडमधील विविध प्रभागांमध्ये पावसाळी गटारांच्या सफाईची कामे सुरू झाली आहेत.