नवी मुंबई : नाईक परिवाराच्या भाजपप्रवेशानंतर बेलापूर मतदारसंघातील गुंता पुन्हा वाढला आहे. मुख्यमंत्र्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारीचे आश्वासन दिले आहे. शिवसेनाही या मतदारसंघावर दावा करणार असून गणेश नाईक यांच्या उमेदवारीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ अशी बेलापूरची एकेकाळी ओळख होती. २००४ मध्ये या मतदारसंघाचे विभाजन होऊन त्याचे कार्यक्षेत्र बेलापूर ते वाशीपर्यंत मर्यादित झाले. या मतदारसंघावर माजी मंत्री गणेश नाईक यांचे अनेक वर्षांपासून एकहाती वर्चस्व होते. चार वेळा ते या मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मंदा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाईक परिवार भाजपमध्ये प्रवेश करत आहे. यामुळे पुन्हा गणेश नाईक या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे बालले जात होते; पण आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध करून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून त्यांना उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले आहे. यामुळे गणेश नाईक भाजपमध्ये जाणार का व बेलापूरमधून निवडणूक लढणार की नाही, याविषयी शंका उपस्थित होऊ लागली आहे.शिवसेना व भाजप युतीमध्ये बेलापूर मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. उपनेते विजय नाहटा यांनी या मतदारसंघातून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरात संघटना मजबूत करण्यासह विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. युती झाल्यास नवी मुंबईमधील एक मतदारसंघ शिवसेना व एक भाजपला दिला जाणार आहे. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. यामुळे ऐरोली मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली तर बेलापूर शिवसेनेला सोडला जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. युतीमध्ये उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीला या मतदारसंघात उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.बेलापूरमधील आमदारवर्ष विजयी उमदेवार पक्ष१९७८ गौतम भोईर जनता पक्ष१९८० भगत काथोड काँगे्रस१९८५ जनार्दन गौरी काँगे्रस१९९० गणेश नाईक शिवसेना१९९५ गणेश नाईक शिवसेना१९९९ सीताराम भोईर शिवसेना२००४ गणेश नाईक राष्ट्रवादी२००९ गणेश नाईक राष्ट्रवादी२०१४ मंदा म्हात्रे भाजप