वाशी-कोपरखैरणे पाठोपाठ बेलापूर डेपोही कात टाकणार

By नारायण जाधव | Published: May 17, 2023 11:29 PM2023-05-17T23:29:19+5:302023-05-17T23:29:34+5:30

१३ माळ्यांची इमारत : दीड लाख चौरस फूट बांधकाम

Belapur depot will also be cultivated nicely after Vashi-Koparkhairane | वाशी-कोपरखैरणे पाठोपाठ बेलापूर डेपोही कात टाकणार

वाशी-कोपरखैरणे पाठोपाठ बेलापूर डेपोही कात टाकणार

googlenewsNext

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: वाशी, कोपरखैरणे पाठोपाठ नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बेलापूर येथील बसस्थानकाचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे. बेलापूर येथील बस डेपो १३ माळ्यांचा राहणार असून, त्यावर महापालिका १०० कोटींहून अधिक रक्कम खर्च करणार आहे.

बेलापूर येथील बसस्थानकाची ही इमारत एक एकर भूखंडावर बांधण्यात येणार आहे. यात वाशी आणि कोपरखैरणेप्रमाणेच बसस्थानकासह कार्यालये, पार्किंग, हाॅटेल, सभागृह विकसित करण्यात येणार आहे. सुमारे दीड लाख चौरस फुटाचे येथे बांधकाम करण्यात येणार आहे. वाशी आणि कोपरखैरणेप्रमाणे बेलापूर येथील बसस्थानकाची इमारत सुंदर आणि देखणी राहणार असून, तिचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सध्या एनएमएमटीच्या वाशी सेक्टर - ९ मधील बस डेपोचे काम अंतिम टप्प्यात असून, सेक्टर १२ मधील डेपोचे काम प्रगतीपथावर आहे. याच अंतर्गत कोपरखैरणे-बेलापूर बसस्थानकांचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे. यात वाशी सेक्टर-९ मधील बसस्थानकाची इमारत २१ माळ्यांची आहे. या ठिकाणी बसस्थानकासह कार्यालये, पार्किंग, हाॅटेल, सभागृह विकसित केले आहे. सेक्टर १२ मधील डेपोचाही विकास करण्यात येत आहे. तेथे तरण तलावासह बसस्थानक, कार्यालये बांधण्यात येत आहेत. शिवाय सौरउर्जा प्रकल्पही विकसित करण्यात येत असून, त्याचे काम ४५ टक्के पूर्ण झाले आहे. कोपरखैरणे डेपोच्या जागेवर दुमजली बेसमेंटसह २० माळ्यांची इमारत बांधण्यात येत आहे. १.७ एकर भूखंडावर ४ लाख चौरस फुटांचे बांधकाम येथे करण्यात येणार आहे.
.........
असा होणार खर्च
वाशी बस डेपोच्या पुनर्विकासावर १८० कोटींहून अधिक तर कोपरखैरणे डेपोवर २३० कोटी आणि बेलापूर डेपोवर १०० कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात येणार आहे.
.....
लीजवर देऊन खर्च वसूल करणार
बसस्थानकांच्या पुनर्विकसित वास्तूंचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यातील व्यापारी गाळे, कार्यालये, हॉटेल ही लीजवर देऊन महापालिका झालेला खर्च वसूल करणार आहे. या सर्व वास्तूंचे बांधकाम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर हे जातीने लक्ष देत असून, त्यादृष्टीने ते संबंधित साइटवर वारंवार भेट देऊन बांधकामांची प्रगती तपासत आहेत.
..........
चार्जिंग स्टेशनची सोय
वाशी-कोपरखैरणे आणि बेलापूर डेपोच्या आवारात एनएमएमटीच्या इलेक्ट्रिक बस चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. डेपोनिहाय या चार्जिंग स्टेशनची संख्या वेगवेगळी आहे.
.......

Web Title: Belapur depot will also be cultivated nicely after Vashi-Koparkhairane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.