नवी मुंबईतील गवळीदेव, पांडव कडासह बेलापूर किल्ल्यास मिळेल चालना
By नारायण जाधव | Published: July 17, 2023 08:10 PM2023-07-17T20:10:22+5:302023-07-17T20:10:37+5:30
वर्षाला एक लाख पर्यटकांनी भेट दिल्यास मिळतील पाच कोटी, क वर्ग पर्यटनस्थळांत होणार समावेश
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: राज्यातील निधीअभावी रखडलेल्या छोट्या पर्यटन स्थळांचा आता लवकरच क वर्ग पर्यटन स्थळांत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या राज्यातील ‘ब’ व ‘क’ वर्ग पर्यटन स्थळे घोषित करण्याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीस आहेत. परंतु, एखाद्या स्थळास ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ घोषित करण्याबाबतचे निकष नव्हते. ते आता पर्यटन विभागाने निश्चित केले आहेत. यानुसार एखाद्या पर्यटन स्थळांत वर्षभरात एक लाख पर्यटकांनी भेट दिली असली तरी त्यांचा ‘क’ वर्ग पर्यटन स्थळांत समावेश करून वर्षाला पाच कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
शासनाच्या नव्या निकषांचा राज्यातील अनेक छोट्या-मोठ्या पर्यटनांना फायदा होणार आहे. यात नवी मुंबईतील गवळीदेव, पांडवकडा या धबधब्यांसह बेलापूर किल्ला, गोवर्धनी माता मंदिरासह शहरांतील जागृतेश्वर, पावणेश्वर या सारख्या मंदिरांनाही होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
शासनाच्या नव्या निकषांनुसार क वर्ग पर्यटन स्थळ घोषित करण्यासाठी त्या स्थळास ऐतिहासिक, नैसर्गिक किंवा भौगोलिक महत्त्व असले पाहिजे. त्यात नवी मुंबईतील उपरोक्त सर्व पर्यटनस्थळे बसतात. नवी मुंबईतील गवळीदेव, पांडवकडा या धबधब्यांसह बेलापूर किल्ला, गोवर्धनी माता मंदिरासह शहरांतील जागृतेश्वर, पावणेश्वर मंदिरास ऐतिहासिक, नैसर्गिक किंवा भौगोलिक महत्त्व आहे. शिवाय येथे दरवर्षी एक लाखांवर पर्यटक भेट देतात. गवळीदेव, पांडवकडा या धबधब्याच्या ठिकाणी तर पावसाळ्यात दररोज पाच सहा हजार पर्यटक भेट देतात. तर नवरात्रौत्सावात गोवर्धनी माता मंदिरासह बेलापूर किल्ल्यास दररोज हजारो पर्यटक येतात. याशिवाय अनेक इतिहासप्रेमी या किल्ल्याला सतत भेट देतात.
असे आहेत शासन आदेश
जिल्ह्यातील लहान पर्यटनस्थळी पर्यटकांना मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येतो. हे पाहता, जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय एक किंवा दोन वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळी मूलभूत सुविधा निर्माण करून त्यांच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांपर्यंतचे प्रस्ताव पर्यटन संचालनालयास पाठवावेत, असे निर्देश दिले आहेत.
‘क’ वर्ग पर्यटनस्थळासाठीचे नवे निकष
प्रस्तावित पर्यटनस्थळास दरवर्षी किमान एक लाख पर्यटकांनी भेट दिलेली असावी, पर्यटक संख्या पोलिस अधीक्षक, आयुक्तांकडून प्रमाणित असली पाहिजे. स्थळास ऐतिहासिक, नैसर्गिक किंवा भौगोलिक महत्त्व असले पाहिजे. कोणत्याही पर्यटन, तीर्थक्षेत्र, यात्रास्थळी, जत्रास्थळी एकाच प्रासंगिक यात्रेसाठी येणारी संख्या ‘क’ वर्ग देण्यास पुरेशी नाही. तेथे इतर दिवशीही पर्यटक येणे अपेक्षित आहे. ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यापूर्वी त्या ठिकाणी किमान मूलभूत सुविधा (पोहच रस्ता, पिण्याच्या पाण्याची सोय, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन इ.) उपलब्ध असल्याची खातरजमा करावी, ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ घोषित करण्याच्या प्रस्तावासोबत जागेची मालकी, उपलब्ध क्षेत्राबाबत स्पष्ट माहिती द्यावी.