नवी मुंबई : बेलापूर किल्ला संवर्धनकरिता त्याच्या पडक्या तटबंदी व तडे गेलेले कोट दगडी बांधकाम करून मजबूत करणे, किल्ल्यांवर जाणाऱ्या दगडी पायऱ्यांची पायवाट नव्याने बांधणे, ढासळलेले बुरुज भक्कम करणे तसेच ॲम्पीथेटर, कॅफेटेरिया, स्वच्छता, गृह वाहनतळ, फूडमॉल अशा १८ कोटी रुपये खर्च करून विविध विकासकामे काही तरुणांनी बंद पाडल्यापासून रखलेले आहे. यामुळे ही कामे त्वरित सुरू करण्याची मागणी बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत केली. ‘लोकमत’ने नुकतीच या विषयाला वाचा फोडली हाेती.
सिडकोकडून सुरू असलेले संवर्धनाचे काम बंद केल्यामुळे अर्धवट राहिलेले काम भर पावसाळ्यात आलेल्या वादळाने कोसळले गेले. बेलापूर येथे खाडीकिनारी डोंगराच्या टेकडीवर पोर्तुगीजांच्या काळात समुद्र मार्गावर टेहळणीसाठी बांधलेला हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू असून, चिमाजी अप्पाने उभारलेली ही वास्तू नवी मुंबईचे वैभव मानले जाते. नवी मुंबईकरांना लाभलेल्या अशा या पुरातन वास्तूचे जतन व्हावे, अशी अनेक शिवप्रेमी व दुर्गप्रेमींची मागणी असल्याने किल्ल्यांच्या संवर्धन कामास पुन्हा सुरुवात झाल्यास या ऐतिहासिक वास्तूचे जतन होण्याच्या कामास गती मिळणार आहे...........पुरातत्व विभागाने हे काम आम्ही सुरू असे सांगितले होते. परंतु, अद्यापपर्यंत कुठल्याच कामाची प्रक्रिया सुरू केली नाही. यामुळे ते त्वरित सुरू करावे असे पुरातत्व खात्याला आदेश देण्यात यावेत, अशी म्हात्रे यांनी हिवाळी अधिवेशनात मागणी केल्याने शिवप्रेमी व दुर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.