बेलापूर किल्ला होणार पर्यटनस्थळ, सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 03:20 AM2019-02-17T03:20:30+5:302019-02-17T03:20:56+5:30
पर्यटनस्थळ म्हणून होणार विकास : कंत्राटदाराची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात
नवी मुंबई : ऐतिहासिक बेलापूर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या कामासाठी कंत्राटदाराची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, साधारण एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. पुरातत्त्व विभागाच्या मंजुरीनंतर सिडकोने या संबंधीचा आराखडा तयार केला आहे. हा ऐतिहासिक किल्ला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा सिडकोचा मानस आहे.
बेलापूर किल्ला हा नवी मुंबईमधील एकमेव ऐतिहासिक ठेवा आहे. १५६० मध्ये किल्ल्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. १७३३ मध्ये चिमाजी आप्पाने हा किल्ला जिंकला व तब्बल ८४ वर्षे तो मराठा साम्राज्याचा भाग होता. ४५७ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या किल्ल्याला पूर्वी पाच मोठे बुरूज होते. त्यापैकी तीन बुरूज निखळले आहेत. सध्या दोन बुरुजांचे अवशेष शिल्लक आहेत, त्यामुळे वेळीच त्याचे संवर्धन झाले नाही, तर किल्ल्याचे संपूर्ण अस्तित्व संपून जाईल, अशी भीती इतिहासप्रेमींनी व्यक्त केली होती, तसेच किल्ल्याच्या संवर्धनासाठी तातडीने कार्यवाही करावी, यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी विविध स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानुसार सिडकोने या किल्ल्याचे संवर्धन करण्याचा निर्णय घेत २०१७ मध्ये या कामासाठी निविदा मागविल्या होत्या; परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दोन वेळा फेरनिविदा मागविण्यात आल्या. तिसऱ्यांदा केवळ एकच कंत्राटदाराने निविदा सादर केली. ही ऐकमेव निविदा स्वीकारण्यात आली असून तांत्रिक आणि आर्थिक बाजूची पडताळणी करण्यासाठी ती निविदा कमिटीकडे पाठविण्यात आली आहे. निविदा कमिटीच्या अभिप्रायानंतर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मान्यता घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सूत्राने दिली.
किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा खर्च निर्धारित केला आहे. काम पूर्ण करण्याची कालमर्यादा २४ महिन्याची असणार आहे. याअंतर्गत किल्ल्याच्या सभोवतालची दोन हेक्टर जागाही सुशोभित करणार आहे. किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूला कोणताही धक्का न लावता हे सुशोभीकरणाचे काम केले जाणार आहे.
प्रस्तावित सुविधा
नवी मुंबईतील एकमेव ऐतिहासिक ओळख असलेल्या बेलापूर किल्ला आणि परिसरात सुशोभित करून एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. यात अॅम्पी थिएटर, फूड कोर्ट, टेहळणी बुरूज तसेच प्रशस्त पार्किंग, सुसज्ज आसन व्यवस्था, विरंगुळा केंद्र, आॅडिओ, व्हिडीओ आणि चित्र रूपात किल्ल्याचा इतिहास सांगणारी यंत्रणा आदी सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहेत.
बेलापूर किल्ल्याची डागडुजी करून ऐतिहासिक ठेवा जतन केला जाणार आहे. या किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याची योजना आहे. त्यासाठी कंत्राटदार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. साधारण एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.
- प्रिया रतांबे,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, सिडको