बेलापूरमधील कोरोनामुक्तीचे प्रमाण सर्वांत कमी; दिघ्यात सर्वांत कमी शिल्लक रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 02:15 AM2020-12-03T02:15:29+5:302020-12-03T02:15:47+5:30
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी महानगरपालिकेने व्यापक स्वरूपात उपाययोजना सुरू केल्या आहेत
नवी मुंबई : शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १ टक्क्याने घसरून ९४ टक्क्यांवर आले आहे. बेलापूरमध्ये कोरोनामुक्तीचे प्रमाण ९३.४६ वर आले आहे. घणसोलीमध्ये हे प्रमाण ९६.११ झाले आहे. दिघामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यत यश येत असून तेथे शिल्लक रुग्णांची संख्या २१वर आहे.
दिवाळीनंतर नवी मुंबईमध्येही रुग्णांची संख्या वाढली लागली होती. मात्र मागील तीन दिवसांमध्ये प्रादुर्भाव कमी करण्यात पुन्हा यश येऊ लागले आहे. महानगरपालिकेने आतापर्यंत तब्बल ३ लाख ८७ हजार रुग्णांची चाचणी केली असून, त्यामध्ये २ लाख २६ हजार ३३१ अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६० पर्यंत पोहोचले होते. मागील काही दिवसांत ते घसरून ९४.८१ वर आले आहे. सद्य:स्थितीमध्ये बेलापूरमध्ये सर्वाधिक शिल्लक रुग्ण आहेत. नेरूळ, ऐरोली, वाशीमध्येही शिल्लक रुग्णांची संख्या २०० पेक्षा जास्त आहे.
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी महानगरपालिकेने व्यापक स्वरूपात उपाययोजना सुरू केल्या आहेत. या उपाययोजनांना नागरिकांनीही प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक असून त्यासाठी मनपाने जनजागृतीवर विशेष भर दिला आहे.