नामदेव मोरेनवी मुंबई : नागरिकांमधील उदासीनतेमुळे नवी मुंबईची वाटचालही ५० हजारच्या दिशेने सुरू झाली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुन्हा रुग्णवाढ सुरू झाली आहे. बेलापूर, नेरुळसह ऐरोलीमध्ये सर्वाधिक रुग्ण वाढत असून बेलापूरमधील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण घसरून ९३.८१ झाले आहे.
नवी मुंबईमध्येही कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वाटू लागली आहे. आरोग्य विभागाने अथक परिश्रमाने कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश मिळविले होते. परंतु दिवाळीमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केल्यामुळे पुन्हा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मागील आठवड्यात प्रतिदिन सरासरी ९४ जणांना कोरोनाची लागण होत होती. हे प्रमाण आता सरासरी १४७ वर पोहोचले आहे. शिल्लक रुग्णांची संख्या ११८९ वरुन १४१६ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६० वरून ९४.९७ वर आले आहे. शहरातील आठपैकी ३ विभागांमध्ये स्थिती बिकट होत चालली आहे. बेलापूरमध्ये शिल्लक रुग्णांची संख्या ३२६, नेरुळमध्ये २७० व ऐरालीमध्ये २११ झाली आहे. बेलापूर, ऐरोली व वाशीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्केच्या खाली आले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ३५२ वरून २४२ एवढे खाली घसरले आहे.
कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली होती. परंतु दिवाळीपासून स्थिती बिघडली आहे. प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत आहे. महानगरपालिकेने चाचण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. मागील आठवड्यात सरासरी १९४४ जणांची प्रतिदिन चाचणी होत होती. सद्यस्थितीमध्ये हे प्रमाण ३२६८ वर आले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह एमआयडीसीमध्येही चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. प्रत्येक नोडमध्ये चाचणी केंद्र आहेत. परंतु अनेक नागरिक लक्षणे असूनही चाचणी करून घेत नाहीत. चाचणी करण्यास विलंब केल्यास प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे लक्षणे दिसल्यास किंवा रुग्णाच्या संपर्कात आल्यास तत्काळ चाचणी करण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर लवकरच नवी मुंबईमध्येही कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रतिदिन जवळपास तिघांचा मृत्यू नवी मुंबईमध्ये सोमवारपर्यंत ९६१ जणांचा मृत्यू झाला होता. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन जवळपास तिघांचा मृत्यू होऊ लागला आहे. सर्वाधिक १४९ जणांचे मृत्यू ऐरोलीत झाले असून सर्वात कमी दिघामध्ये झाले आहेत. अशीच स्थिती राहिली तर लवकरच बळींचा आकडा हजार टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
शहरातील विभागनिहाय रुग्णांची स्थिती विभाग शिल्लक रुग्ण मृत्यू बेलापूर ३२६ १३६नेरुळ २७० १४४ऐरोली २११ १४९वाशी १६९ ९९तुर्भे १४५ १३६कोपरखैरणे १४२ १४७ घणसोली १३७ १०६दिघा १६ ४४