बेलापूर गाव कात टाकणार; नागरी सुविधांचे ग्रामस्थांसमोर सादरीकरण
By नारायण जाधव | Published: March 16, 2024 06:51 PM2024-03-16T18:51:54+5:302024-03-16T18:55:14+5:30
नवी मुंबईतील शासकीय कार्यालये, बँकांची विभागीय मुख्यालये असलेल्या सीबीडी नजीकच्या बेलापूर गावातील विविध सुविधांचे सादरीकरण शुक्रवारी ग्रामस्थांसमोर करण्यात आले.
नवी मुंबई: नवी मुंबईतील शासकीय कार्यालये, बँकांची विभागीय मुख्यालये असलेल्या सीबीडी नजीकच्या बेलापूर गावातील विविध सुविधांचे सादरीकरण शुक्रवारी ग्रामस्थांसमोर करण्यात आले. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर बेलापूर गाव पूर्णत: कात टाकणार आहे. यामध्ये सर्व सुविधांयुक्त तरुणांना खेळण्याकरिता स्टेडियम, चार मजली वाहनतळ, बहुउद्देशीय इमारत, भाजी व फळमार्केट, ग्रंथालय, तरुणांसाठी जिम, बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र, तलाव सुशोभीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, लग्न समारंभासाठी हॉल तसेच सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. याकरिता आमदार निधीची तरतूदही करण्यात येणार आहे.
बेलापूर गावाचा कायापालट होऊन स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. याच अनुषंगाने चांगले शिक्षण, आरोग्य सुदृढ होण्यास मदत मिळणार आहे. स्वच्छता व सार्वजनिक उपक्रमाला चालना मिळणार असल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे या सुविधांसाठी पाठपुरावा करणाऱ्या स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. यावेळी माजी विरोधी पक्षनेता पंढरीदादा पाटील, राममंदिर संस्था अध्यक्ष चंद्रकांत पाटील, नारायण मुकादम, महादेव पाटील, रवींद्र म्हात्रे, बाळकृष्ण बंदरे, शैलजा पाटील, ज्योती पाटील, प्रियांका म्हात्रे, संदेश पाटील, मनोज म्हात्रे, प्रकाश मुकादम, वैभव मुकादम तसेच बेलापूर मधील असंख्य नागरिक उपस्थित होते.