बेलापूरच्या सिडकोच्या अर्बन हाटला लागलेले टाळ उघडणार; बचत गटांना व्यासपीठ मिळणार
By नारायण जाधव | Published: July 27, 2023 11:59 AM2023-07-27T11:59:45+5:302023-07-27T12:00:15+5:30
आ. मंदा म्हात्रे यांनी सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांना लवकरात लवकर अर्बन हाट पुन्हा चालू करावे असे पत्राद्वारे कळविले आहे.
नवी मुंबई – राज्य शासनाच्या लघू उद्योग विकास विभागाकडे बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आ मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सिडकोने पर्यावरणाला धक्का न लावता उभारलेल्या या कलाग्रामचे स्थान नैसर्गिक असून बेलापूर रेल्वे स्थानकाजवळील 12 एकरच्या टेकडीवर उभारलेले कलाग्राम (अर्बन हाट) ला लागलेले टाळे अखेर उघडणार आहे त्यामुळे महिला बचत गटांना व असंख्य हस्तकला व हातमाग कलाकारांना हक्काची बाजारपेठ पुन्हा उपलब्ध होणार आहे.
कोरोना काळानंतर सिडकोने बंद ठेवलेले अर्बन हाट पुन्हा कार्यान्वित न करता अर्बन हाटला कायमचे टाळे ठोकले होते. त्यामुळे महिला बचत गट व असंख्य हातमाग व हस्तकला कलाकारांची हक्काची बाजारपेठ हिराऊन घेण्यात आली होती. याच अनुषंगाने गुरूवारी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आ. मंदा म्हात्रे यांनी सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांना लवकरात लवकर अर्बन हाट पुन्हा चालू करावे असे पत्राद्वारे कळविले आहे.
म्हात्रे यांनी सांगितले की, मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता याकरिता राज्य शासनाने निर्माण केलेल्या नवी मुंबईत एकही नैसर्गिक आकर्षक स्थळे नाहीत त्यामुळे सिडको व महापालिकेच्या यांच्या संयुक्त माध्यमातून कृत्रिम पर्यटन स्थळांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला व सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशोक सिन्हा यांनी या केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाकडून व राज्य शासनच्या लघू उद्योग विकास विभागाकडून तसेच तत्कालीन विधानपरिषद सदस्या मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांतून बेलापूर रेल्वे स्थानकाजवळ सुमारे १२ एकरच्या टेकडीवर २००८ रोजी कलाग्राम (अर्बन हाट) उभारून देशातील महिला बचत गटांना व राज्यातील कलाकारांना एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध केली होती. तसेच २०१० रोजी या कलाग्रामचे कायमस्वरूपी लोकार्पण झाल्यानंतर सिडको आयोजित नवी मुंबई फेस्टिवल अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले तसेच अँम्फीथिएटरमध्ये जाहीर कार्यक्रम ही झालेले आहेत.
हिंदी-मराठी सिनेकलावंतांनी या फेस्टिव्हलमुळे या कलाग्रामला भेटी दिल्या होत्या या कलाग्राममध्ये गणेश उत्सव, श्रावण मेळा, दसरा मेळा, दीप मेळा अशा अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम होत होते. तसेच हरियाणा, केरळ अशा विविध राज्यातून स्वतः तयार केलेले उत्पादन विकण्यास घेऊन येत होते. परंतु कोरोना काळात सिडकोने अर्बन हाटला टाळे लावल्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे हे लक्षात येताच आ. म्हात्रे यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक डिग्गीकर यांना सदरच्या अर्बन हाट ची संपूर्णता डागडुगी पूर्ण करुन लवकरात लवकर पावसाळ्यात नंतर अर्बन हाट सुरु करुन द्यावे असे पत्राद्वारे कळविले असून लवकरच विशेषत: महिला बचत गटांना व कलाकारांना तसेच विविध राज्यातील उत्पादकांना सुगीचे दिवस येणार असल्याचे त्यांनी सांगितले.