पराभवाची भीती न बाळगता स्वत:वर विश्वास ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 02:28 AM2018-01-20T02:28:48+5:302018-01-20T02:28:48+5:30
इतिहास निर्माण करण्याची ताकद सामान्य माणसात असते. त्यासाठी स्वत: वर विश्वास ठेवा आणि पराभवाची भीती बाळगू नका, असे विचार कल्याण परिक्षेत्राचे अप्पर पोलीस आयुक्त प्रतापराव दिघावकर यांनी
पनवेल : इतिहास निर्माण करण्याची ताकद सामान्य माणसात असते. त्यासाठी स्वत: वर विश्वास ठेवा आणि पराभवाची भीती बाळगू नका, असे विचार कल्याण परिक्षेत्राचे अप्पर पोलीस आयुक्त प्रतापराव दिघावकर यांनी मांडले. डी.डी. विसपुते कॉलेज आॅफ फार्मसीच्या ‘आदर्श कला महोत्सवांतर्गत ‘फ्लूओरेजन’ या सांस्कृतिक कार्यक्र माच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आहे.
‘फ्लूओरेजन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी दिघावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी धूतपापेश्वर आयुर्वेदिक फार्मसीचे संचालक रणजीत पुराणिक, जयदीप जाधव, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब विसपुते, चिटणीस संगीता विसपुते, प्राचार्य आशीष जैन, सेलिब्रेटी ‘बारायण’ चित्रपटाचे दिग्दर्शक व पटकथा लेखक दीपक पाटील, निर्मात्या दैवता पाटील व अभिषेक गोपालन उपस्थित होते.
आपण ग्रामीण भागातून एका शेतकरी कुटुंबातून आलो असून, आज शिक्षण आणि मेहनतीमुळेच या पदावर आलो आहे. युनोमध्ये दीड तास भाषण करण्याची संधी मिळाली, हे सर्व आत्मविश्वासामुळे व कष्ट केल्यामुळेच शक्य झाल्याचे या वेळी दिघावकर यांनी सांगितले. आज भारताला महासत्ता बनवण्याची जबाबदारी तरुणांच्या खांद्यावर आहे. त्यासाठी मोठी स्वप्न बघा आणि स्वत:वर विश्वास ठेवून ती पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. स्पर्धा परीक्षा देऊन देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी काही मदत लागली तर मला भेटा, असा मोलाचा सल्ला त्यांनी अखेरीस दिला. दैवता पाटील यांनी, करिअरसाठी मुलांनी आईवडिलांशी संवाद साधणे गरजेचे असून, निर्णय घेण्यापूर्वी चर्चा करण्याचा सल्ला दिला.