प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना झुकते माप

By admin | Published: March 29, 2017 05:56 AM2017-03-29T05:56:44+5:302017-03-29T05:56:44+5:30

महापालिकेमध्ये एक वर्षापासून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना झुकते माप देण्यात आले आहे. अनेक अधिकाऱ्यांचे काम

Bent measurements to deputation officers | प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना झुकते माप

प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना झुकते माप

Next

नामदेव मोरे / नवी मुंबई
महापालिकेमध्ये एक वर्षापासून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना झुकते माप देण्यात आले आहे. अनेक अधिकाऱ्यांचे काम समाधानकारक नसतानाही त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. दुसरीकडे पालिकेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक देण्यात आली व अनेकांवर निष्काळजीपणासह इतर ठपके ठेवून कारवाईही करण्यात आली.
ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. पालिकेची स्थापना झाल्यानंतर ग्रामपंचायतीमधील शिपाई व लेखनिकांचाही पालिकेत समावेश झाला. नियमाप्रमाणे यातील अनेकांना पदोन्नती मिळत गेली व विभाग अधिकारी ते उपआयुक्तपदापर्यंतची पदेही या अधिकाऱ्यांनी भूषविली. आतापर्यंत आलेल्या आयुक्तांनी प्रतिनियुक्तीसह येथे पूर्वीपासून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधून महापालिकेचा कारभार उत्तमपणे चालविला.
परंतु मागील एक वर्षापासून प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना झुकते माप देण्यास सुरवात झाली व येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू झाले. जवळपास १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जगन्नाथ सिन्नरकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी या त्रासाला कंटाळून राजीनामा देणे पसंत केले. ग्रामपंचायतीमधून पालिकेत आलेल्या सुरेश पाटील यांच्यासारखा सर्वांशी योग्य संवाद ठेवून काम करणारा अधिकारी निवृत्त झाला, परंतु निवृत्तीनिमित्त त्यांना साधा बुकेही देण्यात आला नाही.
पालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू झाले, पण ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली त्यापैकी एकही अधिकारी प्रतिनियुक्तीवर आलेला नाही. यामुळे येथील अधिकारी चुकीचे काम करत असून प्रतिनियुक्तीवर आलेले सर्व जण उत्तम कार्य करतात का, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला होता. घणसोलीमधील विभाग अधिकारी दिवाकर समेळ यांना किरकोळ कारणांसाठी निलंबित करण्यात
आले.
अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त कैलास गायकवाड यांनाही आयुक्तांच्या बदलीच्या काही दिवस अगोदर मूळ संवर्गात पाठविण्यात आले. या सर्व घडामोडींमुळे शासनाकडून आलेले अधिकारी व पालिकेतील अधिकारी यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, विद्यमान आयुक्त एन.रामास्वामी यांना ही दरी मिटवून पालिकेचा कारभार चालविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

सुहास शिंदेंचा मुक्काम  ३ वर्षे ८ महिने

शासनाने महापालिकेत पाठविलेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुख्य लेखा परीक्षक सुहास शिंदे हे सर्वाधिक काळ नवी मुंबईमध्ये कार्यरत आहेत. १७ आॅक्टोबर २०१३ रोजी त्यांची नियुक्ती झाली तेव्हापासून सलग ३ वर्षे ८ महिने झाले तरी त्यांची अद्याप बदली झालेली नाही. लेखा परीक्षक हे अत्यंत महत्त्वाचे पद त्यांच्याकडे असले तरी ते त्या पदावर फारसे रमलेच नाहीत. मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावरही ते अनेक दिवस कार्यरत होते. तेव्हा बिले देणे व तपासणे ही दोन्ही कामे एकाच अधिकाऱ्याकडे असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात त्यांची नियुक्ती चक्क प्रशासन उपआयुक्तपदावर करण्यात आली. लेखा परीक्षक म्हणून त्यांनी फारसा प्रभाव पाडला नाहीच शिवाय आयुक्त आले की त्यांच्या पुढे - पुढे करण्यात ते हजर असतात अशी टीका पालिकेत सुरू आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला तेव्हाही ते पुढे दिसलेच शिवाय विद्यमान आयुक्त एन. रामास्वामी आल्यानंतर कारमधून उतरताना हस्तांदोलनासाठी सर्वात पुढे गेले ते सुहास शिंदेच. त्यांचे पुढे - पुढे करणे अनेकांना खटकले.

शासनाकडून महापालिकेत
आलेल्या अधिकाऱ्यांचा तपशील

नावपद
अंकुश चव्हाण  अतिरिक्त आयुक्त
रमेश चव्हाण  अतिरिक्त आयुक्त
तृप्ती सांडभोर  उपआयुक्त
उमेश वाघ  उपआयुक्त
तुषार पवार  उपआयुक्त
मोमीन एजाज  संचालक नगररचना
स. पं. उगिले  नगररचनाकार
डॉ. सुहास शिंदे  मुख्य लेखा परीक्षक
धनराज गरड  मुख्य लेखा व वित्त अधिकारी
संदीप संगवे  शिक्षणाधिकारी
अंगाई साळुंखे  सहायक आयुक्त
ज्योती धोत्रे  सहायक आयुक्त
तुषार बाबर  सहायक आयुक्त

Web Title: Bent measurements to deputation officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.