बेस्ट कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात, प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:31 AM2018-06-13T04:31:54+5:302018-06-13T04:31:54+5:30
बेस्ट कामगारांचे प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत, तर सहकुटुंब आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी जुईनगर येथे आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
नवी मुंबई - बेस्ट कामगारांचे प्रलंबित प्रश्न सुटले नाहीत, तर सहकुटुंब आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कामगारांच्या प्रश्नांवर चर्चेसाठी जुईनगर येथे आयोजित बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या वेळी महापौर जयवंत सुतार यांनीही बेस्टच्या कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.
जुईनगर येथील गणेश मंदिर सभागृहात रविवारी बेस्ट कामगारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने ही बैठक घेण्यात आली. या वेळी समितीचे प्रमुख कामगारनेते शशांक राव, उदय भट, अरविंद कागीनकर, विजय कुलकर्णी यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले, तर नवी मुंबई महापालिकेचे महापौर जयवंत सुतार यांनीही या बैठकीला उपस्थित राहून बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. तसेच परिवहन ही महापालिकेचीच जबाबदारी असून, नवी मुंबईप्रमाणे मुंबई महापालिकेनेही ती स्वीकारावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
राव यांनी बेस्टच्या कामगारांची आर-पारच्या लढ्याची वेळ आल्याचे सांगितले; परंतु कामगारांचे प्रश्न सुटण्याऐवजी ते सरकार दरबारी लाल फितीच्या कारभारात अडकून पडत असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली. यामुळे जर शासनाने बेस्टच्या कामगारांच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर सहकुटुंब मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना घेरू, असा इशारा शशांक राव यांनी दिला आहे. या बैठकीला शहरातले रहिवासी असलेले बेस्टचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.