गाढेश्वर धरणावर पोलिसांचा चोख बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:02 AM2018-06-25T02:02:20+5:302018-06-25T02:02:39+5:30
दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे पर्यटकांचा गाढेश्वर व खारघर येथील पांडवकडा धबधब्याकडे ओढा वाढला आहे
मयूर तांबडे
पनवेल : दोन दिवसांपासून अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे पर्यटकांचा गाढेश्वर व खारघर येथील पांडवकडा धबधब्याकडे ओढा वाढला आहे. रविवारी सुट्टीचा दिवस आणि त्यात सकाळपासून कोसळणाºया पावसामुळे अनेक पर्यटकांनी या धबधब्यांकडे आपला मोर्चा वळविला. मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना धरणावर मज्जाव केल्याने अनेकांचा हिरमोड झाला. गाढेश्वर धरणावर तर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोेलिसांनी अनेक पर्यटकांची वाहने रस्त्यातूनच परत पाठविली. त्यामुळे मुंबई, ठाणे व रायगडमधून आलेल्या शेकडो पर्यटकांची मोठी निराशा झाली.
पनवेल तालुक्यातील गाढेश्वर (देहरंग) धरण परिसरात पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात मौज करण्यासाठी शनिवार आणि रविवारच्या दिवशी हजारो पर्यटक येतात. अति उत्साहामुळे काही पर्यटक खोल पाण्यात उतरतात. अनेकदा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात घडतात. अशा अपघातात अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे. दरवर्षी पावसाळ्यात होणाºया अशा अपघातांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने पोलिसांनी यावर्षी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या गाढेश्वर धरणावर कडा पहारा ठेवण्यात आला आहे. धरणाकडे जाणाºया तरुणाईला रस्त्यातच अडवून त्यांना परत पाठविले जात आहे. विशेष म्हणजे हौशी पर्यटकांना अटकाव करण्यासाठी पोलिसांचे फिरते पथकही तैनात करण्यात आले आहे. धरणाच्या दिशेने जाण्यास प्रतिबंध घातला जात असल्याने अनेकांनी रिक्षा व एसटी या प्रवासी वाहनांचा आधार घेत धरण गाठल्याचे दिसून आले.
तालुका पोलिसांनी येथील वाजे गावाजवळ बॅरीगेट्स लावले आहेत. मद्यपींना धरणाच्या परिसरात देखील फिरकू दिले जात नाही. सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यटकांनी धरण परिसरात जाऊ नये, असे आवाहन केले जात आहे. पर्यटकांनी पाण्यात उतरू नये व स्वत:चा जीव धोक्यात घालू नये असा संदेशही पोलिसांकडून देण्यात
येत आहे.