वाशी टोलवर चोख बंदोबस्त
By admin | Published: January 31, 2017 03:46 AM2017-01-31T03:46:25+5:302017-01-31T03:46:25+5:30
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवार, ३१ जानेवारीला नवी मुंबईमध्येही चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. वाशी व कामोठे टोलनाक्यावर महामार्ग
नवी मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवार, ३१ जानेवारीला नवी मुंबईमध्येही चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. वाशी व कामोठे टोलनाक्यावर महामार्ग अडविण्याचा इशारा देण्यात आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
‘एक मराठा लाख मराठा’ची घोषणा देत राज्यभर मूक मोर्चे काढल्यानंतरही शासनाने अद्याप समाजाच्या मागण्या मान्य केल्या नसल्याने चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाज नवी मुंबईच्यावतीनेही वाशी व कामोठे टोलनाक्यावर आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी शहरभर बैठका घेवून व सोशल मीडियामधून आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी कोकण भवनमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये ५ लाखपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते.
चक्का जाम आंदोलनासही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्यात यावे असे संदेश रात्री उशिरापर्यंत पोहचविले जात आहेत. सायन - पनवेल महामार्गावर हे आंदोलन होणार असल्याचे पोलीस यंत्रणेवरही ताण आला आहे. कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
नवी मुंबईमधील मराठा समाजाचे नागरिक व माथाडी कामगार सकाळी ९ वाजता माथाडी भवनसमोर एकत्र येणार आहेत. येथे आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह मराठा समाजाचे विविध पदाधिकारी चर्चा करून आंदोलन कुठे करायचे हे निश्चित करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
दोन हजार पोलीस तैनात
मंगळवारी होणाऱ्या चक्का जाम मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त लावला आहे. पोलीस ठाण्याचे व वाहतूक विभागाचे सुमारे दोन हजार पोलीस बंदोबस्तावर कार्यरत राहणार असून त्यांची साप्ताहिक सुटी रद्द करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालय क्षेत्रात चक्का जाम केला जाऊ शकेल अशी दोन ठिकाणे पोलिसांना अपेक्षित आहेत. त्यामध्ये वाशी टोल नाका व कळंबोली हायवे या ठिकाणांचा समावेश असून, अशा संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता दंगल निवारण पथक, वरुण व वज्र, स्ट्रायकिंग फोर्स हे देखील सज्ज ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त तुषार दोषी यांनी दिली. तर यापूर्वीचे मराठा मोर्चे शांततेत झालेले असल्यामुळे मंगळवारी होणारा मोर्चा देखील कायद्याच्या चौकटीत राहून होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.