सावधान ! तुमच्या पाणीपुरीतील पाणी शौचालयातील तर नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 07:30 AM2022-12-24T07:30:56+5:302022-12-24T07:32:01+5:30
वाशी स्थानकात स्वच्छतागृहात आढळला पाणीपुरी स्टॉल
नवी मुंबई : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकातील एका शौचालयात पाणीपुरीचा स्टॉल ठेवल्याचे आढळले आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या प्रकारामुळे पाणीपुरी खाणाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, शौचालयातील पाणी पाणीपुरीसाठी वापरण्यात येत होते की नाही, याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
- वाशी रेल्वे स्थानकातील एका शौचालयात हा पाणीपुरीचा स्टॉल ठेवल्याचे आढळले आहे.
- मात्र, या स्टॉलधारकावर अजून कोणतीही कारवाई झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नवी मुंबई- येथील वाशी रेल्वे स्थानकाच्या शौचालयामध्ये पाणीपुरीचा स्टॉल, व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/eAlCIbnUTi— Lokmat (@lokmat) December 23, 2022
रेल्वेने हात झटकले
वाशी रेल्वे स्थानकाच्या आवारात सार्वजनिक शौचालयामध्ये पाणीपुरी स्टॉल असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या निदर्शनास आली. स्थानकाची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे काम सिडकोचे असल्यामुळे ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच सिडकोच्या सुरक्षारक्षकांनी पाणीपुरी स्टॉल हटवला आहे. या प्रकरणाचा रेल्वे प्रशासनाशी काहीही संबंध नाही.
ए. एन. सिंग,
व्यवस्थापक, वाशी रेल्वे स्थानक
सिडको विक्रेत्यावर काय कारवाई करते याकडे लक्ष
- संबंधित पाणीपुरी स्टॉलचालक तसेच सुलभ शौचालय ठेकेदारावर त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. एका शीतपेयाच्या मशीनवर पाणीपुरीचे पॅकेट्स ठेवल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
- ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे, त्याला व्हिडीओ काढण्यास शौचालय चालक विरोध करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
- नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या परिसरात पाणीपुरी, भेळपुरीसह खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. ते चालविणारे फेरीवाले हे मानखुर्द, गोवंडी परिसरातील परप्रांतीय आहेत. स्टॉल ठेवण्यासाठी स्वच्छतागृह चालविणारे पैसेही घेत असल्याची चर्चा आहे.
- नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचे संचलन सिडकोकडे आहे. रेल्वे सेवा आणि जीआरपीचा बंदोबस्त वगळता इतर सर्व सेवा सिडको पुरवते. यामुळे सिडको शौचालय चालकासह पाणीपुरी विक्रेत्यावर काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.