चर्चेतला गाव: तांदळाच्या भाकरीचे गाव, घणसोलीमध्ये दररोज होते १० हजार भाकऱ्यांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 11:41 AM2022-08-21T11:41:34+5:302022-08-21T11:42:48+5:30
भाकर ही नवी मुंबईतील घणसोली गावाची वेगळी ओळख म्हणून उभी राहिली आहे.
- अनंत पाटील
भाकर ही नवी मुंबईतील घणसोली गावाची वेगळी ओळख म्हणून उभी राहिली आहे. एकट्या घणसोली गावातून दररोज सुमारे १० हजार भाकरींची विक्री होते.
तांदळाच्या भाकरीचा चंद्रच या गावातील महिलांना आपल्या पायावर उभा करण्यास कारणीभूत ठरला आहे. भाकरी बनवूनच या गावातील प्रत्येक महिला आज सक्षम बनली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी आपल्या कुटुंबालाही आधार दिला आहे.
स्वातंत्र्यलढ्यात घणसोली गावचे फार मोठे योगदान आहे. याच गावचा चेहरामोहरा नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसीच्या विकासकामांमुळे बदलत चालला आहे. गावाचे आता शहरीकरण झपाट्याने होत असताना गावातील महिलांच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीमुळे आपली वेगळी ओळख टिकवून आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे, या गावात घरटी बनविल्या जाणाऱ्या तांदळाच्या पिठापासून तयार होणारी पांढरी शुभ्र भाकरी. या भाकरीच्या व्यवसायामुळे गावठाणातील महिला मंडळे आणि काही महिलांच्या बचत गटांना चांगल्या प्रकारे रोजगार निर्माण झाला आहे.
एक महिला एकावेळी ५० ते ७० भाकरी मातीच्या तव्यावर करून देते. नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईतील अनेक पंचतारांकित हॉटेलांनाही येथील तांदळाच्या भाकऱ्या पुरविल्या जातात. घणसोलीत मशीनवर भाकरी बनविण्याच्या १० ते १२ गृहउद्योग आहेत. तर कोपरखैरणे गावातील काही निवडक बचत गटाच्या महिला मंडळाकडूनही तांदळाच्या भाकऱ्या ऑर्डर्सनुसार बनविल्या जातात.
१५ रुपये मशीनवर तयार केलेली भाकरी
२० रुपये चुलीवरील भाकरी
चुलीवर एक भाकरी तयार करण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. तर मशीनवर एकाचवेळी १० मिनिटांमध्ये १० ते १५ तांदळाच्या भाकरी तयार होतात. वेळ आणि कमी प्रमाणात इंधन बचत होत असल्याने भाकरीला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
- गीता सुविद पाटील, भाकरी केंद्रचालक, घणसोली.