भंगारमाफियांचा गोरेगावात हैदोस
By admin | Published: March 31, 2017 06:16 AM2017-03-31T06:16:39+5:302017-03-31T06:16:39+5:30
गोरेगाव, लोणेरे शहरात अनधिकृत कारवायांना मागील अनेक दिवसांपासून ऊत आला आहे. मूळचे बांगलादेशी नागरिक
माणगाव : गोरेगाव, लोणेरे शहरात अनधिकृत कारवायांना मागील अनेक दिवसांपासून ऊत आला आहे. मूळचे बांगलादेशी नागरिक स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून बेकायदा अनेक प्रकारचे धंदे करीत आहेत. भंगाराच्या नावाखाली वेगवेगळे धंदे सुरू आहेत. ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली जात नाही. भंगार व्यवसायासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही परवानगी आवश्यक असते. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत कोणत्याही परवानग्या तपासत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. या शेडसाठी कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क न भरता, भराव करत आहेत. हा भराव करताना पारंपरिक मोठा नाला (कलवनी) बुजविण्याचा प्रयत्न केल्याने पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता आहे.
गोरेगाव व लोणेरे शहरामध्ये अनेक भंगारमाफियांनी बस्तान मांडले आहे. भंगार खरेदी-विक्र ीच्या नावाखाली वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावामुळे गोरेगाव पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करून तपासणी करीत नाही, अथवा बेकायदा चालू असलेल्या भंगार अड्ड्यावर कोणतीही कारवाई करीत नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामध्येही स्थानिक पुढाऱ्यांनी मध्यस्ती केल्यामुळे त्यावर होणारी कारवाई टळली असली, तरी चरस-गांजाची विक्र ी मात्र थांबलेली नाही. हे मादक पदार्थ याच माफियांच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याचा स्थानिकांना संशय आहे.
गोरेगावमधील बीएसएनएल टॉवर शेजारी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत अनधिकृत कोणतीही परवानगी न घेता भली मोठी शेड उभी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीत चौकशी केली असता, ग्रामपंचायतीने यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नसल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)
गोरेगाव ग्रामपंचायतीकडून आजतागायत भंगार व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत क्षेत्रात कोणताही व्यवसाय सुरू करताना ग्रामपंचायतीची परवानगी घेणे बंधनकारक आहे. नाला बुजविण्याबाबत ग्रामपंचायतीकडून तत्काळ नोटीस बजावण्यात येत आहे.
- गणेश खातू,
ग्रामविकास अधिकारी