भारत सेवाश्रम संघाची कर्करोग पीडितांना मदत
By admin | Published: February 4, 2017 03:40 AM2017-02-04T03:40:50+5:302017-02-04T03:40:50+5:30
वाशी गावातील भारत सेवाश्रम संघाच्या वतीने गेली २९ वर्षे देशभरातील कॅन्सरग्रस्त रुग्ण अत्यल्प खर्चात उपचार, आर्थिक सहाय्य, शिक्षण, रोजगाराची संधी उपलब्ध
- प्राची सोनवणे, नवी मुंबई
वाशी गावातील भारत सेवाश्रम संघाच्या वतीने गेली २९ वर्षे देशभरातील कॅन्सरग्रस्त रुग्ण अत्यल्प खर्चात उपचार, आर्थिक सहाय्य, शिक्षण, रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये जास्त प्रमाणात कॅन्सरग्रस्त रुग्ण आढळत असून या रुग्णांना राहण्या-खाण्यासाठी, उपचारासाठी पुरेपूर सहाय्य करण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते.
परराज्यातून येणाऱ्या रुग्णांना राहण्याची सोय, भरपेट जेवण, उपचाराकरिता रुग्णालयातील खर्चात मदत, फावल्या वेळेत कौशल्य विकास तसेच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम वर्षोनुवर्षे केले जात आहे. आसाम, नागालँड, बांगलादेश, नेपाळ, ओडिशा, बंगाल आदी रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. खारघर येथील टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी दररोज मोफत बससेवा पुरविली जात असून आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील रुग्णांना याठिकाणी मोफत उपचार दिले जातात. याठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांकरिता दररोज सकाळी ३ तासांची शिकवणी,संगणक प्रशिक्षण दिले जाते. दर आठवड्याला याठिकाणी राहणाऱ्या रुग्णांच्या आरोग्य तपासणीकरिता तज्ज्ञ डॉक्टर भेट देतात. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी अंबिका योग कुटीरच्या सहयोगाने याठिकाणी योगाभ्यासाचे धडे दिले जातात. सध्या ११० कर्करोग रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची विविध विषयांवर शिकवणी घेतात.
जागतिक दर्जाचे केंद्र
नवी मुंबई हे देशातील कॅन्सर संशोधनासाठीचे प्रमुख केंद्र ठरू लागले आहे. खारघरमध्ये ६० एकर भूखंडावर टाटा मेमोरियल सेंटर उभारण्यात आले आहे. येथे २५० बेडचे सुसज्ज रूग्णालय आहे. रूग्णांवर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडीओलॉजी उपचारांची सुविधा आहे.याठिकाणी संशोधनाचीही सुविधा असून तज्ज्ञ डॉक्टर घडविण्याचे काम सुरू आहे.
आसाम भवनमधील दोन मजले रुग्णांसाठी
आसाममधील वाढत्या कर्करोग रुग्णांची दखल घेत वाशीतील आसाम भवनमधील दोन मजले केवळ कर्करोग रु ग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय विविध उपचारांसाठी आसाम सरकारने निधीतही वाढ केली असून औषधोपचार, प्रवास खर्च, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- कर्करोग कसा होतो, त्याची लक्षणे, उपचार पध्दती आदींविषयी माहिती देण्यासाठी महिन्यातून एकदा जनजागृती शिबिराचे आयोजन केले जाते. नवी मुंबई परिसरातील शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी याठिकाणी भेट देऊन रुग्णसेवेत पुढाकार घेत असल्याची माहिती संस्थाचालक स्वामी प्रशांतानंदजी दिली.