लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मनसेने यंदाच्या मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत सावध पावले टाकत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, इतर पक्षाने युती वा आघाडीचा प्रस्ताव दिल्यास त्यावर पक्षध्यक्षांसोबत चर्चा केली जाईल. त्यांच्या निर्देशानुसारच एकत्र लढणार असल्याचा पर्यायही राखून ठेवला आहे.२००७ मधील पालिका निवडणुकीत मनसेने माजी शहराध्यक्ष अरूण कदम यांच्या नेतृत्वाखाली चार जागांवर विजय मिळवला होता. २०१२ मधील निवडणुकीत मात्र एकमेव उमेदवार निवडून आला. तोसुद्धा सेनेत गेल्याने मनसेच्या अस्तित्वाला धक्का लागला. यानंतर पक्षबांधणीसाठी उपाध्यक्ष अरूण कदम यांच्यावर जबाबदारी सोपवली. मात्र पक्षातील अंतर्गत कुरघोडीमुळे नाराज होऊन सेनेत सामील झाले. उरलेसुरले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोट बांधून शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी पक्षाच्या पुर्नबांधणीसाठी प्रयत्न सुरु केले. यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यावर ठाकरे यांनी मनसैनिकांना लढण्याचे निर्देश दिले. पक्षाची स्थिती नाजूक असली तरी निवडणुकीत स्वबळावर उतरण्याची तयारी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी सक्षम उमेदवार मिळत नसले तरी निष्ठावंतांना उमेदवारी देण्याचा विचार केला जात आहे. तसेच इतर पक्षातील पदाधिकारी देखील पक्षात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या निवडणुकीसाठी सुमारे ३० इच्छुकांना संधी देण्याचा निर्णय तूर्तास घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत मते विभागणीसाठी मनसेचा वापर काही बड्या राजकीय पक्षांकडून केला जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मनसेने मात्र त्याला भीक न घालण्याची ठाम भूमिका घेतली आहे. हे खरे असले तरी ऐन निवडणुकीच्यावेळेत काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भार्इंदर निवडणूक मनसे स्वबळावर लढणार
By admin | Published: June 27, 2017 2:53 AM